'नव्या वर्षात होणार मंत्रिमंडळ फेररचना'; भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष महिनाअखेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2025 07:57 IST2025-01-02T07:56:16+5:302025-01-02T07:57:33+5:30
पक्ष संघटन मजबूत करण्यावर आता भर दिला जात आहे.

'नव्या वर्षात होणार मंत्रिमंडळ फेररचना'; भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष महिनाअखेर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: नवीन वर्षात मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्याचे संकेत सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले आहेत.
पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानावडे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर व राज्यसभेचे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी मुख्यमंत्र्यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बैठकही झाली. बैठकीनंतर पत्रकारांनी नजीकच्या काळात मंत्रिमंडळ फेररचना होणार आहे का? असा प्रश्न तानावडे यांना केला असता ते म्हणाले की, नवीन वर्षात मंत्रिमंडळाची फेररचना होण्याची शक्यता आहे. सध्या संघटनात्मक निवडणुकांच्या कामात सर्वजण व्यस्त आहोत. येत्या १० तारखेपर्यंत मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच जिल्हाध्यक्षही निवडले जातील. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्षही निवडला जाईल.
दरम्यान, मंत्रिमंडळ फेररचनेची चर्चा गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून आहे. चतुर्थीआधी फेरबदल होतील, असा बोलबाला होता. परंतु तो काही झाला नाही. नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे तो रखडला. आता नवीन वर्षात फेररचना होऊ शकते. तानावडे यांनी त्याच अनुषंगाने संकेत दिलेले आहेत.
कार्यकर्त्यांची आज बैठक
तानावडे पुढे म्हणाले की, संघटनात्मक निवडणुकांच्या अनुषंगाने आज, गुरुवारी उत्तर गोव्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची व दक्षिण गोव्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका होतील. सदस्यता मोहीम अलीकडेच पार पडलेली आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यावर आता भर दिला जात आहे.