धार्मिक प्रकल्पांसाठी बफर झोन निर्माण करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 20:02 IST2018-11-30T19:51:50+5:302018-11-30T20:02:52+5:30
राज्यातील धार्मिक प्रकल्पांसाठी बफर झोन निर्माण केला जाईल, असे नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

धार्मिक प्रकल्पांसाठी बफर झोन निर्माण करणार
पणजी - राज्यातील धार्मिक प्रकल्पांसाठी बफर झोन निर्माण केला जाईल, असे नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
पिलार सेमीनारीजवळ एक मोठे बांधकाम उभे राहत आहे. पिलार सेमिनारीचा त्यास आक्षेप आहे. मंत्री सरदेसाई यांनी स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यासोबत पिलार सेमिनारीला शुक्रवारी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिल्वेरा यांनी हा विषय गेल्या विधानसभा अधिवेशनातही उपस्थित केला होता.
आम्ही संबंधित बांधकामासाठी कारणो दाखवा नोटीस जारी करू. बिल्डरने केलेल्या सगळ्य़ा बेकायदा गोष्टी त्या नोटीसमध्ये नमूद केल्या जातील, असे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. धार्मिक स्थळांच्या बाजूने यापुढे जी बांधकामे होतील, त्यासाठी बफर झोन असेल याची काळजी यापुढे घेतली जाईल. आमचा पाठींबा पिलार सेमिनारीला आहे. आम्हाला नियोजनबद्ध विकास हवा पण स्थानिक भावनांचाही विचार करावा लागेल, असे सरदेसाई म्हणाले.
पिलार सेमिनारीजवळ काम करणारे बांधकाम व्यवसायिक हे गोमंतकीय नव्हे. गेले वर्षभर हा विषय गाजत आहे पण बांधकाम व्यवसायिकाने संवेदनशीलता दाखवली नाही. आम्ही यापूर्वी कार्मोणा येथील रहेजाचा प्रकल्प बंद केला आहे. मी स्वत: एक अॅक्टीवीस्ट असून जो मंत्रीपदी पोहचला आहे. मी बांधकाम व्यवसायिकांना भेट देखील नाही. जिथे विकास व्हायला हवा, तिथे व्हायलाच हवा. मात्र वर्टिकल पद्धतीने तो व्हावा. व्होरिझंटल पद्धतीने तो झाला तर गोवा हिरवा राहणार नाही, असे सरदेसाई म्हणाले. पिलार सेमिनारीच्याबाजूने चाललेल्या बांधकामात जर काही गैर आढळून आले व ते बांधकाम टीसीपीला सादर केलेल्या प्लॅननुसार नाही असे आढळून आले तर ते बांधकाम आम्ही बंद करू, असे सरदेसाई यांनी सांगितले.