ब्राझिल दौऱ्याची भरपाई प्रलंबित
By Admin | Updated: February 3, 2015 01:36 IST2015-02-03T01:36:26+5:302015-02-03T01:36:26+5:30
पणजी : एरव्ही प्रचंड खर्च करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मंत्री, आमदारांकडे आता सरकारचे देणे फेडण्यासाठी मात्र पैसे नाहीत.

ब्राझिल दौऱ्याची भरपाई प्रलंबित
पणजी : एरव्ही प्रचंड खर्च करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या मंत्री, आमदारांकडे आता सरकारचे देणे फेडण्यासाठी मात्र पैसे नाहीत. मंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्यासह तीन आमदार गेल्या जुलैमध्ये ब्राझिलच्या दौऱ्यावर जाऊन आले; पण आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजूनही त्यांनी सरकारचे देणे फेडलेले नाही. त्यामुळे आता हा विषय आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे पोहोचविला आहे.
ब्राझिल दौऱ्यावर जाऊन आलेल्या मंत्री व आमदारांना देणे फेडण्यासाठी पर्रीकर सरकारने ४५ दिवसांची मुदत गेल्या आॅगस्टमध्ये दिली होती. ती मुदत कधीच संपली. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी, मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार ग्नेल टिकलो, कार्लुस आल्मेदा व बेंजामिन सिल्वा यांनी शासकीय पैसे परत केलेले नाहीत.
ब्राझिलमध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी मंत्री आवेर्तान व तिघे आमदार गेले होते. क्रीडा मंत्री रमेश तवडकर व वीजमंत्री मिलिंद नाईक यांचीही नावे अगोदर शिष्टमंडळात होती. नंतर त्यांनी माघार घेतली व ते ब्राझिलला गेले नाहीत. गोव्यातील मंत्री, आमदारांच्या या ब्राझिल दौऱ्यावर त्या वेळी राष्ट्रीय स्तरावरून प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे सरकारने हे मंत्री, आमदार गोव्यात परतल्यानंतर दौऱ्यावरील खर्च स्वत:च्या खिशातून परत करतील, असे जाहीर केले होते. मंत्री, आमदारांच्या दौऱ्यावर प्रत्येकी १४ लाख ९ हजार रुपयांचा खर्च झाला. आश्चर्य म्हणजे १४ लाख रुपये सरकारला परत करण्याऐवजी आवेर्तान यांनी केवळ तीन लाख रुपये परत केले आहेत. टिकलो, कार्लुस व बेंजामिन यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये भरले आहेत. आम्हाला पैसे भरण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती या सर्वांनी गेल्या आॅगस्टमध्ये केली होती. सरकारने ही विनंती तत्काळ मान्य करून ४५ दिवसांचा अवधी दिला होता. त्यानंतरही पैसे भरले गेलेले नाहीत. याविषयी सुदीप ताम्हणकर यांनी सोमवारी दक्षता खात्याकडे तक्रार केली आहे. लूट दोन प्रकारची असते, एक कायदेशीर व दुसरी बेकायदा असे पर्रीकर म्हणायचे. काँग्रेसवाले करत होते ती बेकायदा लूट, असेही पर्रीकर सांगायचे. आता विद्यमान मंत्री, आमदार सरकारी पैसे थकवून जी लूट करतात ती कायदेशीर की बेकायदा, असा प्रश्न ताम्हणकर यांनी विचारला आहे. (खास प्रतिनिधी)