अनैतिक संबंधातूनच खून
By Admin | Updated: February 4, 2015 02:36 IST2015-02-04T02:28:52+5:302015-02-04T02:36:55+5:30
वास्को/पणजी : क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या आणि मानवी नात्यांना काळिमा फासणाऱ्या वास्कोतील सासू-सुनेच्या दुहेरी

अनैतिक संबंधातूनच खून
वास्को/पणजी : क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या आणि मानवी नात्यांना काळिमा फासणाऱ्या वास्कोतील सासू-सुनेच्या दुहेरी खुनाची कबुली धाकटी सून प्रतिमा नाईक हिने मंगळवारी रात्री पोलिसांसमोर दिली. प्रतिमाला पोलिसांनी अटक केली असून तिची आई आणि प्रियकराचाही या कारस्थानात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आपल्या अनैतिक संबंधांचा भांडाफोड होईल, या भीतीपोटीच प्रतिमाने दोघींचा काटा काढल्याच्या निष्कर्षाप्रत तपास पथक आले आहे.
गोव्याला हादरवून सोडणाऱ्या या खूनप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमांतर्गत खुनाच्या आरोपाखाली आणि १२० (बी) अंतर्गत कारस्थान रचण्याच्या गुन्ह्याखाली प्रतिमाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तिच्या प्रियकराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच काटे-बायणा येथे राहाणाऱ्या तिच्या आईचीही भूमिका संशयास्पद असल्यामुळे तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. तसे संकेत देत पोलिसांनी गुन्हा नोंदविताना एकापेक्षा अधिक व्यक्तींनी हे कारस्थान रचल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिमा ही डॉक्टर असलेल्या जाऊ नेहा हिच्याशी लहान सहान कारणांवरून भांडण उकरून काढायची. नेहाला ६ महिन्यांची मुलगी होती, तर प्रतिमाला मूल नव्हते. शिवाय तिला ‘हिपॅटायटिस बी’चा आजार होता. त्यामुळे तिचा द्वेषाग्नी भडकला होता व त्याचे परिमार्जन खुनात झाले.
दरम्यान, अधिक चौकशीसाठी प्रतिमाला १४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आली आहे, तर मृत नेहाच्या मुलीला तिच्या वास्कोत राहणाऱ्या मावशीकडे सोपविण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)