धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही भाजप कार्यकर्ते...; सुदिन ढवळीकर यांचा भाजपला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:25 IST2024-06-13T15:23:47+5:302024-06-13T15:25:03+5:30
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. दक्षिण गोव्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कामच केले नाही, हे सत्य आहे.'

धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही भाजप कार्यकर्ते...; सुदिन ढवळीकर यांचा भाजपला घरचा आहेर
पणजी : 'धर्मगुरूंना दोष देऊन चालणार नाही, दक्षिणेत काही मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्ते कामच करत नव्हते.' असे विधान वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. ढवळीकर हे भाजपसोबत सत्तेत आहेत. असे असूनही त्यांनी सडेतोडपणे वरील भाष्य केले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'सत्य हे सत्य असून ते अबाधित आहे. काही गोष्टी कितीही लपवल्या तरी झाकून राहत नाहीत. दक्षिण गोव्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी कामच केले नाही, हे सत्य आहे.'
ढवळीकर म्हणाले की, पराभवाच्या बाबतीत धर्मगुरूंना निशाणा करणे चुकीचे आहे. धर्मगुरू, मग तो ख्रिस्ती असो किंवा हिंदू, चांगल्या गोष्टी सांगून समाजाला प्रबोधन करण्याचे काम ते करत असतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदू धर्मगुरूंनी जो काही उपदेश केला तो हिंदू धर्मियांनी मानून घेतला व ख्रिस्ती धर्मगुरूंनी जे काही सांगितले ते त्याचे पालन ख्रिस्ती बांधवांनी केले. निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. आम्ही एकमेकांच्या धर्मगुरूंवर दोषारोप करणे योग्य नव्हे.'
प्रत्येक धर्माचे धर्मगुरू समाजाला त्यांच्या परीने चांगल्या गोष्टी सांगत असतात.समाजाला मार्गदर्शन करत असतात. एकमेकांच्या धर्मगुरू वर आरोप करणे चुकीचे ठरेल.'