भाजपचा प्रचार जानेवारीपासून
By Admin | Updated: December 27, 2015 01:29 IST2015-12-27T01:28:55+5:302015-12-27T01:29:52+5:30
पणजी : राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये होईल, असे गृहीत धरले

भाजपचा प्रचार जानेवारीपासून
पणजी : राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक जानेवारी २०१७ मध्ये होईल, असे गृहीत धरले आहे. येत्या महिन्यात भाजपचे मोठे अधिवेशन होणार असून त्या वेळीच एकप्रकारे निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला जाईल, अशी माहिती मिळाली.
एकूण २६ मतदारसंघांत भाजपने सर्वेक्षण करून घेतले आहे. २०१७च्या निवडणुका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली लढवायच्या व २६ जागांना लक्ष्य बनवावे असे भाजपमध्ये ठरले आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात याबाबतची रूपरेषा आखली जाईल, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. अधिवेशनावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर प्रदेश भाजपला मार्गदर्शन करणार आहेत.
तीन वर्षांनंतर सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बुथस्तरीय समित्या निवडण्यात येत आहेत. त्यानंतर मंडल समित्या निवडल्या जाणार आहेत. पक्षाचे उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष भाजपकडून बदलले जाणार आहेत. येत्या महिन्याच्या अखेरीस भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडले जातील, असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अजून त्यासाठीची तारीख निश्चित झालेली नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून निर्वाचन अधिकारी गोव्यात पाठविले जातील. त्यांच्याकडूनच प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठीची तारीख निश्चित केली जाईल. सध्याचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचीच पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाईल, अशी माहिती मिळते. अजून तरी दुसरे कोणते नाव प्रदेश भाजपने प्रदेशाध्यक्षपदासाठी विचारात घेतलेले नाही. (खास प्रतिनिधी)