गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रतीची लोकभावना
By किशोर कुबल | Updated: December 3, 2023 14:17 IST2023-12-03T14:15:19+5:302023-12-03T14:17:53+5:30
कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रतीची लोकभावना
पणजी : मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्तेकडे कूच केल्याने गोव्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपच्या येथील प्रदेश मुख्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले. मुख्यालयात मोठ्या स्क्रीनवर लावण्यात आली होती. निकाल येत होते तसतसे कार्यकर्ते ‘भाजप झिंदाबाद’, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.
कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पक्षाचे नेते अनिल होबळे, किशोर अस्नोडकर व इतरांनी प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना पेढे भरवले.
हा विजय म्हणजे मोदीजींप्रती लोकभावनांचे प्रतिबिंब - विश्वजित राणे
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी यांनी मध्यप्रदेशमधील ९ मतदारसंघांत प्रचार केला होता. भाजपचे हे नऊही उमेदवार विजयी झाले आहेत. याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले कि, ‘ हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींप्रती लोकभावनांचे प्रतिबिंब आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींचीच सत्ता आलेली लोकांना हवी आहे.’