'माझ्याविषयी आता भाजपच काय ते ठरवेल': लक्ष्मीकांत पार्सेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 13:46 IST2025-02-05T13:46:03+5:302025-02-05T13:46:42+5:30
राजकारणाविषयी मी जास्त बोलणार नाही, असेही पार्सेकर म्हणाले.

'माझ्याविषयी आता भाजपच काय ते ठरवेल': लक्ष्मीकांत पार्सेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मी भाजप सोडला होता, पण मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. माझ्याविषयी काय निर्णय घ्यायचा ते भाजप पक्ष जे कुणी नेते चालवितात, ते घेतील असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
पार्सेकर यांना पत्रकारांनी त्यांच्या फेरप्रवेशाविषयी विचारले असता ते म्हणाले की, भाजप सोडल्यानंतर मी दुसऱ्या कोणत्याच पक्षात गेलेलो नाही. आता दामू नाईक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याने मला आनंद झाला. कारण दामू हे आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. मांद्रेत यापुढील निवडणुकीत बदल होणार का? असे विचारले असता, दर पाच वर्षांनी तिथे बदल होत असतात, असे पार्सेकर म्हणाले. मी सध्या केवळ शिक्षक म्हणून माझे शैक्षणिक संकुल सांभाळत आहे. त्यामुळे मी तेवढ्यापुरतेच काय ते बोलू शकतो. राजकारणाविषयी मी जास्त बोलणार नाही, असेही पार्सेकर म्हणाले.
जीतला मी मत दिले नाही
मांद्रे मतदारसंघातील आमदारांच्या कामाविषयी विचारले असता पार्सेकर म्हणाले की, मी त्याला निवडून आणलेले नाही. लोकांनी त्याला (म्हणजे जीत आरोलकर) निवडून आणल्याने तो कसे काम करतोय याविषयी लोकच बोलू शकतील. मी काही त्याला मत दिले नाही.