लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगोपसोबत युती कायम ठेवावी की नाही याबाबतचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी पक्षाचे संघटन मजबूत करणे ही असून सर्व चाळीसही मतदारसंघात आम्ही भाजप मजबूत करणार आहोत, असे दामू नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
दरम्यान, चाळीसही विधानसभा मतदारसंघ भाजपने २०२७ मध्ये लक्ष्य करण्याचे ठरवले असून कार्यकर्त्यांना संघटीत राहून लढण्याची हाक काल मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. विधानसभा निवडणुकीला आता केवळ २० महिने बाकी आहेत. आम्ही सर्व मतदारसंघांमध्ये आमचे काम चालू केले आहे. चाळीसही मतदारसंघात आमच्या मंडळ समित्या स्थापन झालेल्या आहेत. आतापर्यंत कळंगुट, मांद्रे, डिचोली, प्रियोळ, वास्को, दाबोळी, कुडचडे व सांगे अशा आठ मतदारसंघांमध्ये मेळावे झालेले आहेत. आज, बुधवारी साळगाव व पर्वरी येथे, ३ रोजी, पर्ये व वाळपई येथे, ४ रोजी साखळी व ५ रोजी काणकोण व केपे येथे कार्यकर्ता मेळावे होतील, असेही नाईक म्हणाले. ८ व ९ रोजी ज्यांनी पन्नासहून अधिक सदस्य बनवले आहेत त्या सक्रिय कार्यकर्त्यांचे अनुक्रमे दक्षिण व उत्तर गोव्यात मेळावे घेतले जाणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या स्थापनादिनापासून म्हणजेच येत्या ६ तारीखपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागा, असे आवाहन करुन २०२७ च्या निवडणुकीत भाजपला २७पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात यादृष्टिने काम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आगामी काळातील निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयार व्हावे. एकत्र येत सर्वांनी पक्षासाठी काम करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
श्रेष्ठींना आम्ही आमचे म्हणणे लिहून दिलेय
मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, पक्षाच्या व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही करणे आवश्यक आहे, असे पक्षाला वाटते ते सर्व मी श्रेष्ठींना लिहून दिलेले आहे. या विषयावर श्रेष्ठी मला व मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा बोलावतील.
राजभाषेचा विषय कधीच संपला आहे...
कोअर कमिटीच्या बैठकीत मराठी राजभाषेचा विषय उपस्थित झाला. त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, राजभाषेचा विषय कधीच संपलेला आहे. त्याकाळी 'म्हालगड्यांनी' हा प्रश्न निकालात काढलेला आहे. त्यावर मला आणखी भाष्य करायचे नाहीय. दरम्यान, मगोविरोधात यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर ढवळीकर बंधूंनी थेट दिल्लीला जाऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्याने त्याबद्दल विचारले असता दामू म्हणाले की, आमच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी मी कोणालाही अडवू शकत नाही. आमचे सरकार स्थिर असून हा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. अशा गोष्टी सहज होऊ शकत नाहीत. त्यासाठी आधी सर्वेक्षण असते. स्थानिक पातळीवर बैठका होतात. त्यानंतर पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेत असते.