लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप व मगो युती तुटणार की काय, असा प्रश्र राज्यात निर्माण झालेला असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल थोडे वेगळे भाष्य केले. मंत्री गोविंद गावडे यांनी खूप आक्रमक भूमिका घेत मगोविरुद्ध विधाने केली तरी, मुख्यमंत्री सावंत यांनी भाजप-मगो युती राहील, शेवटी केंद्रीय नेतृत्व काय ते ठरवत असते, असे सांगितले.
'लोकमत'ने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून युतीविषयी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, 'युती तुटणार नाही. युती राहील पण मी जे काही बोललो होतो ते युती तोडण्यासाठी नव्हे. मांद्रे व प्रियोळ हे दोन मतदारसंघ भाजपच लढवणार, आम्ही ते मगो पक्षाला देणार नाही ही माझी भूमिका होती व आहे. शेवटी युती ठेवावी की नाही तो निर्णय भाजपचे केंद्रीय नेते घेत असतात. युती राहणार नाही, असे मी कधीच म्हणालो नाही.'
गोविंद गावडे यांची ढवळीकरांवर टीका
मगो पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे, तर गेली अनेक वर्षे या पक्षाचे अध्यक्षपद एकाच कुटुंबाकडे का? खऱ्या अर्थाने मगो पक्ष बहुजनांचा असेल, भाऊसाहेबांच्या विचारांचा असेल तर मगो पक्षाचे अध्यक्षपद मगोच्या इतर नेत्यांना देऊन दाखवावे, असे थेट आव्हान क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ढवळीकर बंधूंना दिले आहे.
सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री गावडे बोलत होते. भाऊसाहेब बांदोडकरांनी बहुजनांचा पक्ष म्हणून मगो पक्षाची ओळख निर्माण केली होती. राज्यभर या पक्षाचा विस्तार झाला होता. पण, आता हा पक्ष मोजक्याच ठिकाणी आहे. मगोतून बहुजन नेते का सोडून गेले? याचा विचार ढवळकीर बंधूंनी करावा. सध्याचा मगो भाऊसाहेबांच्या विचारांचा आहे तर मगोचे आमदार जीत आरोलकर यांना अध्यक्ष करून दाखवावे. एकाच नेत्याकडे गेली अनेक वर्षे अध्यक्षपद का? भाजप, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात. पण, मगोचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे एकाच कुटुंबाकडे आहे. त्यामुळे हे पद बदलून दाखवावे.
मी आणि माझ्या वडिलांनी मगो पक्षासाठी काम केले आहे. हा पक्ष बहुजनांचा होता. पण, नंतर तो एका कुटुंबाकडे गेला. म्हणून मगोचे अनेक नेते सोडून गेले. कारण या पक्षात आता दुसऱ्या नेत्यांचे ऐकून घेतले जात नाही. त्यांना विश्वासात घेतले जात नाही. तसेच त्यांना मोठे पदही दिले जात नाही. त्यामुळे आज मगोचे नेते पक्ष सोडून भाजपात गेले आहेत.
भाऊसाहेबांचा मगो हा बहुजनांचा होता, तर आता हा पक्ष ढवळीकर बंधूंच्या गोठ्यातला झाला आहे. आता मगो सांभाळणारे एकेकाळी काँग्रेसचे एजंट होते. त्या नेत्यांना फक्त कमिशन आणि सत्ता पाहिजे. याच लोकांनी माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचा अपमान केला होता. मी अगोदर या पक्षात असल्याने हे सगळे जवळून पाहिले आहे, असे मंत्री म्हणाले.
मगो पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. मगोने राज्याच्या विकासाचा पाया रचला आहे. नंतरच्या काळात राजकीय घडामोडीत या पक्षात दुफळी निर्माण झाली. त्याचदरम्यान ढवळीकर बंधूनी हा पक्ष सावरला, ते कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळेच ढवळीकरांविषयी आपल्या मनात आदर आहे. येत्या काळात पक्षाच्या केंद्रीय समितीने, ढवळीकर बंधूनी, तसेच मगोच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारण्यास तयार असल्याचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
फोंड्याची जबाबदारी घेईन
मंत्री गोविंद गावडे म्हणाले, भाजपला मगोसोबत युती करण्याची गरज नाही. फोंडा तालुक्यातील सर्व मतदारसंघात माझे लोक आहेत. भाजपने आदेश दिल्यास फोंडा तालुक्यात भाजपचा विस्तार करण्याची सर्व जबाबदारी मी स्वीकारेन. कारण मी शिरोडा, फोंडा, मडकई, प्रियोळ सर्वत्र फिरत असतो. लोकांशी माझा चांगला संबंध आहे. त्यामुळे भाजपला या तालुक्यात विस्तार करण्यासाठी मगोशी युती करण्याची गरज नाही.
गोविंदने आत्मपरीक्षण करावे : दीपक
मंत्री गोविंद गावडे हे नैराश्यापोटी काहीही बरळत आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण करावे व नैराश्य घालविण्यासाठी योग्य त्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा, अशी प्रतिक्रिया मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही भाजपसाठी काम केले होते. मी स्वतः प्रियोळ मतदारसंघ व इतरत्र बारा ते चौदा बैठका घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी प्रियोळमध्ये आणखी कुणी एवढ्या बैठका घेतल्या नव्हत्या. आम्ही भाजपसाठी युतीच्या धोरणानुसार काम केले होते. मंत्री गावडे यांना काम जमत नसल्याने त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभापती हे काम करत आहेत, असे ढवळीकर म्हणाले. तवडकर यांनी अनेकांना घरे बांधून दिली व सरकारी योजनेखाली अनेकांना घरे बांधण्यासाठी अर्थसाह्यही उपलब्ध करून दिले. गोविंद गावडे यांना हे जमले नाही, असे ढवळीकर म्हणाले.
पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिने अगोदर भाजपचे सर्वेक्षण होईल व तिकीट कुणाला द्यावे ते त्यावेळी ठरेल. आता कुणीच बोलू नये. मी प्रियोळमध्ये काम करतो व फिरतो तेव्हा मी गोविंदविरोधात काहीच बोलत नाही, असे ढवळीकर म्हणाले.