भाजपचा विकासावरच भर: मंत्री रोहन खंवटे; पर्वरी मंडळ अध्यक्षपदी विनीत परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 09:27 IST2025-01-06T09:26:28+5:302025-01-06T09:27:41+5:30
मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनीत परब यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

भाजपचा विकासावरच भर: मंत्री रोहन खंवटे; पर्वरी मंडळ अध्यक्षपदी विनीत परब
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. पक्ष वर्षभर केवळ निवडणुकीचे काम करीत नसून इतर विकासात्मक कामांकडेही लक्ष पुरवितो. २००८-९ पासून पर्वरी मतदारसंघात काम सुरू केले. जेव्हा पर्वरी मतदारसंघ नवीन निर्माण करण्यात आला, त्यावेळी मतदारसंघातील हितचिंतक, पंच सदस्यांना सोबत घेऊन पर्वरीसाठी योजना आखल्या.
२०१२ साली पहिली निवडणूक झाली. जनतेच्या सहकार्याने विजयी झालो. त्या पाच वर्षात माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मदतीने विकासाची कामे मार्गी लावली. विरोधात असूनही सर्वांच्या मदतीने विकासकामे घेतली. आता नव्या उमेदीचे भाजप मंडळ कार्यरत आहे. मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनीत परब यांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पर्वरी भाजप मंडळाच्या अध्यक्ष निवडीनंतर ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, सुकूर सरपंच सोनिया पेडणेकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर आणि तिन्ही पंचायतींचे पंच उपस्थित होते.
तर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार तानावडे म्हणाले की, पक्षासाठी आणि समाजात चांगले काम केल्याची पक्षाकडून नेहमीच दखल घेतली जाते. त्याचे फळ ज्याचे त्याला मिळतेच. पक्षाचे काम करताना संघटितपणे काम करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे एक स्वप्न, ध्येय आहे की, आपला भारत देश जगात क्रमांक एक देश व्हावा. यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन एकत्र काम करणे गरजेचे आहे, असेही तानावडे यावेळी म्हणाले. यावेळी पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पक्षात प्रवेश कारणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये गोविंद पर्वतकर, उल्हास अस्नोडकर, सुभाष साळकर, किशोर अस्नोडकर, अशोक शेट्टी आणि इतरांचा समावेश होता.
किशोर अस्नोडकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित अध्यक्ष विनीत परब, रुपेश कामत, राजन पार्सेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समीर सांकवाळकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.