मांद्रेची जागा भाजप उमेदवार लढविणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 08:17 IST2025-03-19T08:16:37+5:302025-03-19T08:17:25+5:30
भाजप कार्यकर्ता मेळाव्याला मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मांद्रेची जागा भाजप उमेदवार लढविणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नव्या गोव्याची रचना केली. आजचे सरकार त्याच स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम करत आहे. राज्याला आणखी हायटेक बनविण्यासाठी २०२७ मध्येही भाजपचे सरकार सत्तेवर आणावे. आपल्याला प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा असून मांद्रेची जागाही आता भाजपच लढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
मांद्रे जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दया कारबोटकर, मांद्रे मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी प्रा. गोविंद पर्वतकर, भाजप प्रवक्ते माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळकर, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष उत्तम पोखरे उपस्थित होते.
मंडळ अध्यक्ष उत्तम पोखरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सर्व कायकर्ते एकजुटीने काम करतील, अशी ग्वाही दिली. तर रेश्मा केरकर, सुरेखा सावंत यांनी स्वागत केले. सरचिटणीस परेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्याहस्ते मंडल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. मेळाव्याला ३०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षासाठी काम करा
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचा कार्यकर्ता हा प्रथम देश, नंतर पक्ष व त्यानंतर स्वतः या तत्त्वाने काम करत आहे. मतदारसंघातील आमच्या काही कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे गतनिवडणुकीत अवघ्याच मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. मात्र तो आळस झटकून कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर भाजपला मतदान कसे होईल व वाढेल याकडे लक्ष द्यावे. भाजपला २७ जागा जिंकणे सहज शक्य आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मनात कोणतेही मतभेद ठेवू नयेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा
आज कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना तळागाळात पोहचवल्या पाहिजेत. स्वयंपूर्ण मित्र प्रत्येक पंचायत क्षेत्रात असल्याने त्या योजनांचा लाभ सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवा. गृह आधार, लाडली लक्ष्मी, बचत गटासाठी वीस लाख रुपयांचे कर्ज आदी सुविधा लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने निःस्वार्थी वृत्तीने काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
प्रत्येक कार्यकर्त्यावर माझे लक्ष : दामू नाईक
मांद्रे मतदारसंघात मी प्रथमच पोचलो आहे. परंतु, इथे मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो नाही तर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास आलो आहे. बैठकीला किती बूथ अध्यक्ष, किती मंडल सदस्य, पदाधिकारी आले आहेत, याकडे आपले लक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या मनात जर काही गोष्टी असतील तर त्यांनी त्या बोलून दाखवाव्यात. मात्र, पक्षालाच फटका बसेल असे कोणीही करू नये, असेही दामू नाईक म्हणाले.
बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊ : सोपटे
मांद्रे मतदारसंघात ४८ बूथ व १०० कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. मतदारसंघात पराभवानंतरही पक्षाने कार्यालय चालू ठेवून जनतेची कामे मार्गी लावली आहेत. जर कोणी भाजपला बदनाम करत असेल तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ. मुख्यमंत्री सावंत यांचे मतदारसंघाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्यामुळेच मांद्रेतील जनता पुन्हा भाजपच्याच पाठिशी राहील, असा विश्वास माजी आमदार दयानंद सोपटे यांनी व्यक्त केला.