'ज्याच्या हाती ससा, तो पारधी' अशी म्हण आहेच. जिल्हा पंचायत निवडणुकीचे निकाल काल लागले. दोन्ही जिल्हा पंचायतींच्या एकूण ५० जागा आहेत. त्यापैकी बहुतांश जागा सत्ताधारी भाजपने प्राप्त केल्या. भाजपला उत्तर गोव्यात घवघवीत यश मिळाले. त्यातही सत्तरी तालुक्यात भाजपने प्राप्त केलेली आघाडी ही फार मोठी आहे. त्याचे श्रेय मंत्री विश्वजीत राणे व आमदार दिव्या राणे यांना जाते. भाजपने यावेळी बहुतांश ठिकाणी नवे चेहरे रिंगणात उतरविले होते. ८० टक्के नवे उमेदवार देणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी अगोदरच जाहीर केले होते. त्यानुसार नवे उमेदवार पुढे करून त्यांना जिंकून आणले गेले. यात अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले, असे म्हणावे लागेल.
काही मंत्री व आमदारांसाठी मात्र थोडी चिंताजनक स्थिती झेडपी निकालाने अधोरेखित केली आहे. नीळकंठ हळर्णकर हे मंत्रिपदी असून देखील कोलवाळची जागा भाजपला मिळवून देऊ शकले नाहीत. तिथे किरण कांदोळकर यांच्या पत्नी कविता विजयी झाल्या. बेतकी खांडोळा येथे भाजपचे आमदार गोविंद गावडे यांनी फार मोठ्या गर्जना केल्या होत्या. आपल्या काही राजकीय विरोधकांना गोविंद गावडे यांनी प्रचारावेळी गद्दारही म्हटले होते. मात्र गोविंदचा उमेदवार पराभूत होतोय आणि अपक्ष सुनील भोमकर जिंकतोय हे सुरुवातीपासून दिसून येत होते. तसेच घडले. मगोपचे नेते दीपक ढवळीकर यांनी पुन्हा एकदा प्रियोळ मतदारसंघात आपले डोके वर काढलेले आहे. गावडे यांची यापुढील वाटचाल ही अधिक संघर्षाची असेल, हे स्पष्ट झाले आहे.
दक्षिणेतील खोला व उत्तर गोव्यातील हरमल मतदारसंघात कमी मतांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोरजीत मगोपचे आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या महिला उमेदवार आरामात निवडून आणल्या. मात्र हरमलमध्ये भाजपतर्फे दयानंद सोपटे यांनी जो उमेदवार उभा केला होता, त्याच्या वाट्याला पराभव आला. सोपटे यांची मतदारांवरील पकड आता सैल झालेली आहे, असा याचा अर्थ होत असल्याची चर्चा भाजपमध्ये आहेच. कमी मतांनी जरी उमेदवार हरला तरी तिथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अन्य अनेक नेत्यांनी प्रचारकाम केले होते हे लक्षात घ्यावे लागेल. खोला येथे मंत्री रमेश तवडकर यांचे प्रयत्न कमी पडले.
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कष्ट घेतले होते तरी देखील आगोंद-खोला भागात मतदारांनी भाजपला साथ दिली नाही. बार्सेची जागा मात्र बाबू कवळेकर भाजपसाठी जिंकून आणू शकले. काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्टा यांच्यासाठी ही चिंतेची गोष्ट आहे. गिरदोलीमध्ये काँग्रेस नेते युरी आलेमाव यांची गेम यशस्वी झाली. पूर्वीचे भाजपचे नेते संजय वेळीप यांना आपल्या बाजूने आणून युरीने तिकीट दिले व निवडूनही आणले. काँग्रेसला थोडेफार यश दक्षिण गोव्यात प्राप्त झाले. गोवा फॉरवर्ड पक्ष रायमध्ये जिंकू शकला.
आम आदमी पक्ष फक्त कोलवामध्येच जिंकला. आपच्या वाट्याला पूर्ण गोव्यात केवळ एकच जागा आली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आतिशी वगैरेंनी प्रचारकाम केले होते. उत्तर गोव्यात आपची डाळ मुळीच शिजली नाही. आरजी पक्षाला देखील केवळ सांताक्रुझ हा एकमेव झेडपी मतदारसंघ जिंकता आला. चिंबलमध्ये भाजपचे कमळ फुलले. मगो पक्षातून बाहेर जाऊन केतन भाटीकर यांनी कुर्टीत आपला उमेदवार उभा केला होता. मात्र मतदारांनी त्याला साथ दिली नाही. तिथे भाजपचाच विजय झाला. शिवोली व कळंगुटमध्ये लोबो दांपत्याचा प्रभाव कायम राहिला आहे. मायकल लोबो व डिलायला लोबो यांनी आपले उमेदवार जिंकून आणले. डिचोली मतदारसंघातील लाटंबार्से झेडपी मतदारसंघात भाजपला प्रबळ आव्हान मिळाले. कसाबसा भाजपचा विजय झाला.
सत्तरी तालुक्यातील तीन झेडपी मतदारसंघांमध्ये भाजपला प्रत्येकी दहा हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली. हा विक्रमच आहे. सांकवाळमध्ये भाजपचा विजय झाला ही गोष्ट मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासाठी दिलासादायक आहे. झेडपी निवडणूक यशामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वातील शक्ती पुन्हा एकदा दिसून आली आहे. विधानसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली. उत्तर गोव्यात काँग्रेसचा सफाया झाला हे नोंद करावे लागेल.