मुंबईतच होते बिरिंग, सैगल?
By Admin | Updated: January 18, 2015 01:41 IST2015-01-18T01:39:50+5:302015-01-18T01:41:08+5:30
रुबी दुर्घटना : क्राईम ब्रँचकडूनही तपास

मुंबईतच होते बिरिंग, सैगल?
मडगाव : काणकोणातील दुर्घटनाग्रस्त रुबी इमारतीचे बिल्डर परदीपसिंग बिरिंग व जगदीप सैगल हे दोघे दुर्घटना घडल्यानंतर इंग्लंडला पळून गेले होते, की त्यांचे वास्तव्य मुंबईत होते, हा प्रश्न या दोन्ही बिल्डरच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. हे दोन्ही बिल्डर इंग्लंडला असल्याचा बहाणा करून भारतातच राहिले होते आणि गेले वर्षभर ते गोवा पोलिसांना हुलकावणी देत होते.
सैगल व बिरिंग या दोघांना शुक्रवारी वाशी-मुंबई येथे अटक केली होती. शनिवारी त्यांना गोव्यात आणल्यानंतर पणजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या दोघांची चौकशी करण्यासाठी त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा रिमांड देण्यात आल्याची माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक निनाद
देऊलकर यांनी दिली.
हे दोन्ही बिल्डर खरेच विदेशात गेले होते का, याबाबत गोवा पोलीसही तपास करीत आहेत. गेले वर्षभर त्यांचे वास्तव्य कुठे होते आणि ते मुंबईला कसे आले, याची चौकशी करण्यासाठीच आम्ही त्यांचा रिमांड घेतला आहे, असे देऊलकर म्हणाले. पोलिसांच्या दाव्याप्रमाणे, मुंबईत या बिल्डरांचे एक मोठे डील व्हायचे आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा घालून या दोघांना अटक
केली होती.
४ जानेवारी २0१४ रोजी काणकोणात रुबी इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ३२ कामगार ठार झाले होते, तर २४ जण जखमी झाले होते. ज्या दिवशी ही इमारत कोसळली, त्याच सायंकाळी बिरिंग व सैगल यांनी काणकोणातून पलायन केले होते. या एका वर्षानंतर अगदी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी चालू असतानाच या दोन्ही बिल्डरांना झालेली अटक काहीशी संशयास्पद आहे.
यापूर्वी क्राईम ब्रँचकडून न्यायालयाला हे दोन्ही एनआरआय बिल्डर इंग्लंडमध्ये लपून बसल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर बिरिंग याचा पत्ता इंग्लंडमध्ये सापडल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी तयारी सुरू करणार, असेही सांगण्यात आले होते. जर हे दोन्ही बिल्डर इंग्लंडमध्ये होते आणि त्यांच्याविरुद्ध जगातील सर्व एअरपोर्टवर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती, तर हे दोन्ही बिल्डर इंग्लंडहून मुंबईला कसे
आले, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
समाजकार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘ही अटक बनावट असून दोन्ही आरोपी मुद्दामहून पोलिसांना शरण आले आहेत,’ असे म्हटले आहे. ते जर शरण आले नसते, तर त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली गेली असती. आपली मालमत्ता हातची जाऊ नये, यासाठीच ते शरण आले आहेत, असे ते म्हणाले. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपी यापूर्वीच जामीनमुक्त झाले आहेत. त्यामुळे
त्याच धर्तीवर या दोघांनाही जामीन मिळण्याची
शक्यता असल्यानेच आता ते शरण आले आहेत, असे रॉड्रिगीस म्हणाले. (प्रतिनिधी)