शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 08:34 IST2025-03-11T08:30:32+5:302025-03-11T08:34:06+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गोव्यात पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने काम करणार असून, सर्व ४० मतदारसंघात सदस्य वाढवण्यावर भर देणार आहेत.

शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नव्या जोमाने उतरणार आहे. आगामी तीन महिन्यांत चाळीसही मतदारसंघात एक लाख सदस्य नोंदणी पूर्ण करू. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांची मने जिंकू. निवडणुकीतही मुसंडी मारू, अशी घोषणा शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते माजी मंत्री गजानन कीर्तीकर यांनी केली. नानोडा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नव्या जोमाने काम करणार
कीर्तीकर म्हणाले की, गोव्यात शिवसेनेचे सदस्य गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. यापूर्वी आम्ही भाजपसोबत युती करून भाजपला अनेक जागा निवडून दिलेले आहे. आता शिंदे शिवसेना गट गोव्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने काम करणार आहे. त्याच अनुषंगाने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येत आहे. यावेळी शिवसेना नेते सुभाष सावंत, उपेंद्र गावकर, काशिनाथ मयेकर उपस्थित होते.
आगामी निवडणूक लढवणार
कीर्तीकर म्हणाले की, 'सर्व मतदारसंघांत शिवसैनिकांची फौज निर्माण करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. लोकांचे मन जिंकून आम्ही पूर्ण क्षमतेने निवडणुकीसाठी मैदान उतरण्यासाठी सज्ज आहोत. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हा आमचा संकल्प आहे.'
उपेंद्र गावकर यांनी राज्यात शिवसेना मजबूत करताना संपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे सांगितले. राज्यातील निवडक कार्यकर्त्यांनी यावेळी बैठक घेऊन राज्यात संपर्क वाढविण्यासाठी नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला आणि आगमी काळातील समित्यांचे नियोजन करण्यात आले.