उत्तर गोव्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस; भंडारी समाजातून चार 'नवरे'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:13 PM2023-12-06T12:13:07+5:302023-12-06T12:15:23+5:30

लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपच्या तिकिटासाठी भंडारी समाजाचे किमान चार दावेदार आहेत.

big fight in bjp for north goa four candidature from bhandari community | उत्तर गोव्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस; भंडारी समाजातून चार 'नवरे'

उत्तर गोव्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस; भंडारी समाजातून चार 'नवरे'

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपच्या तिकिटासाठी भंडारी समाजाचे किमान चार दावेदार आहेत. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच हे नवे दावेदार पुढे आले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे विद्यमान खासदार म्हणून त्यांचा दावा आहेच. शिवाय तीन माजी मंत्री दयानंद मांदेकर, दिलीप परुळेकर व जयेश साळगांवकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे हे उत्तरेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

दरम्यान, तिकिटासाठी कोणालाही भेटायची मला गरज नाही. दावेदार खूप येतील, पर्वा नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. नाईक म्हणाले की, 'कितीही दावेदार निर्माण झाले तरी मला त्याची पर्वा नाही. कोणी आपण इच्छुक आहे. म्हणून सांगतो त्याच्यावरही मला काही बोलायचे नाही. भाजपात उमेदवार निवडण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे. त्यानुसारच तिकीट दिले जाईल, आधी सर्वेक्षण केले जाते. प्रदेश निवडणूक समिती नावे पाठवते व पक्षाचे संसदीय मंडळ नावावर शिक्कामोर्तब करते.'

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नुकतेच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे भेटून लोकसभेविषयी चर्चा करून आले आहेत. तिकिटासाठी तुम्हीही नड्डांना भेटणार का? असा प्रश्न केला असता, श्रीपाद नाईक म्हणाले की, 'उमेदवारीसाठी मला कोणाची भेट वगैरे घेण्याची गरज भासत नाही. मी विद्यमान खासदार आहे. पाच वेळा निवडून आलो आहे आणि मंत्रीही आहे. त्यामुळे मला कोणी तिकीट नाकारण्याचे कारणच दिसत नाही. पक्ष काय तो निर्णय घेईल. आजवर पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी इमाने इतबारे पार पाडली. यापुढेही माझे हेच धोरण असेल.' 

दरम्यान, उत्तर गोव्यात सुमारे १ लाख भंडारी मतदार आहेत. साळगांव, थिवी, पेडणे, मांद्रे विधानसभा मतदारसंघात भंडारी समाजाचे प्राबल्य आहे. बार्देस व पेडणे तालुक्यात या समाजाचे वर्चस्व आहे. सत्तरीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी श्रीपाद यांना प्रचारासाठी ते आले नाहीत, तरी निवडून आणण्यासाठी आश्वस्त केले आहे. मंत्री रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, आमदार जीत आरोलकर, जेनिफर मोन्सेरात, मायकल लोबो, केदार नाईक हे नाईक यांना मते मिळवून देतील, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे.

पक्षातूनच कट कारस्थान?

श्रीपाद नाईक यांना उमेदवारी डावलण्यासाठी पक्षातूनच कट कारस्थान चालले आहे व पक्षातील एक गट त्यांना तिकीट देण्यास विरोध करत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांची बनलेली आहे. काहीवेळा सरकारी कार्यक्रमांमध्येही त्यांना डावलण्यामागे हा गट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अलीकडेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या उदघाटनावेळी मोदींसोबत रथात नाईक यांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. दोनापावला जेटीचे १७.५ कोटी रुपये खर्पून कें द्राच्यानिधीतून सौंदर्गीकरण केले. परंतु उ‌द्घाटनाला त्यांना बोलावलेच नाही. यामुळे भाऊंच्या समर्थकांचे गैरसमज वाढतच गेले आहेत.

भाऊ पक्षाचे आधारस्तंभ; सोपटेंची टीका अयोग्य

दिलीप परुळेकर म्हणाले की, 'सोपटे इच्छुक आहेत हे मी समजू शकतो. परंतु श्रीपादभाऊंच्या वयावर घसरून त्यांना विश्रांतीचा सल्ला देणे पिटेंना शोभत नाही. श्रीपाद हे एवढी वर्षे निष्ठेने पक्षासाठी काम करीत आहेत. पाचवेळा ते लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत. ते पक्षाचा आधारस्तंभ आहेत. भाऊंना जर पक्ष तिकीट देत नसेल तर मीदेखील इच्छुक आहे. परंतु असे शब्द मी कधीच वापरलेले नाही. पक्षाच्या प्रत्येक निर्णयाशी मी बांधील आहे. इच्छुक असलो तरी उद्या जर पक्षाने आदेश दिला आणि श्रीपाद यांना अर्ज भरताना सूचक म्हणून राहा, असे सांगितले तर मी तेदेखील करीन आणि भाऊंना निवडूनही आणीन. परंतु जर का पक्ष त्यांना तिकीट देणार नसेल तर ती मलाच मिळायला हवी, कारण मी पक्षात ज्येष्ठ आहे. १९९९ पूर्वीपासूनच माझे पक्षासाठी काम आहे आणि इतर दावेदारांप्रमाणे मी कधीही या पक्षातून त्या पक्षात उडी मारलेली नाही.

तर तिकिटावर अधिकार माझा : दयानंद मांद्रेकर

दयानंद मांदेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, पक्ष जर श्रीपादभाऊंना यावेळी तिकीट देणार नसेल तर ज्येष्ठ आमदार म्हणून उमेदवारीवर माझा अधिकार पोचतो. भंडारी समाजात मला मानाचे स्थान आहे. उद्या श्रीपाद यांना पक्ष उमेदवारी देणार नसेल तर ती मला द्यावी, अशी मागणी करण्यासाठी समाजाचे नेते पुढे येतील. याची मला खात्री आहे. मांदेकर म्हणाले की, तिकिटाची मागणी करणारे काहीजण इतर पक्षांमध्ये फिरून आलेले आहेत. माझे तसे नाही. पर्रीकर असताना १९९९ सालापासून मी पक्षासाठी निष्ठेने काम करत आहे. दोन वेळा मी मंत्रिपदही भूषवले आहे. श्रीपाद यांना उमेदवारी देत नसाल तर मी तिकिटाची मागणी का करू नये?

जयेश साळगावकरही इच्छुक

साळगावचे माजी आमदार तथा माजी गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर हे उघडपणे आपण शर्यतीत असल्याचे अजून सांगत नसले तरी ते इच्छुक आहेत, अशी माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे. जयेश यांनी अलीकडच्या काळात भंडारी समाजाच्या कार्यक्रमांना सातत्याने उपस्थिती लावली आहे. भंडारी समाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर जयेश यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: big fight in bjp for north goa four candidature from bhandari community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.