फोंडा येथे भोंदू गजाआड
By Admin | Updated: December 27, 2014 01:10 IST2014-12-27T01:07:45+5:302014-12-27T01:10:59+5:30
आग्रा येथील ‘बाबा’ : संकटावर उपायोजनेच्या बहाण्याने हजारोंचा गंडा

फोंडा येथे भोंदू गजाआड
फोंडा : आजारपणा व घरादारावरील संकटांवर उपाय करण्याच्या बहाण्याने जनतेला हजारो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबास फोंडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
तौफेल इसाबुदीन शेख असे या भोंदूचे नाव असून तो फिरोजाबाद-आग्रा येथील असल्याचे फोंडा पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भोंदू बाबा फोंडा तसेच अन्य शहरात हॉटेलमध्ये राहून हा व्यवसाय करीत होता. दर दोन महिन्यांनी त्याचा फोंड्यात मुक्काम असायचा. आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या लोकांना तो चांदीचा मुलामा दिलेले व अरबी भाषेतील अक्षरे कोरलेले मोठे खिळे देऊन घराच्या अमुकच कोपऱ्यात पुरायला सांगत असे. प्रत्येक खिळ्यासाठी तो ग्राहकांकडून पाच हजार रुपये घेत असे. तसेच तावीज, दोरे या अन्य साहित्यांसाठीही मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचा. या भोंदूला अटक केल्यानंतर चौकशीत अन्य कारनामेही उघड झाल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)