भाऊसाहेबांनी गोव्याचा पाया रचला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 08:33 IST2025-03-13T08:32:37+5:302025-03-13T08:33:18+5:30
बांदोडकर यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

भाऊसाहेबांनी गोव्याचा पाया रचला: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनीच आधुनिक गोव्याचा पाया रोवला. गोवा मुक्तिनंतर भाऊसाहेबांनी प्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा यावर भर दिला आहे. आज आमचे सरकारही गोव्याच्या सर्वांगिण विकासासाठी भाऊसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बुधवारी बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त पणजी येथील जुन्या सचिवालयानजिक आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बांदोडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी वीज मंत्री सुदिन ढवळीकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मिरामार येथील समाधीचे नूतनीकरण सुरू
मुख्यमंत्री म्हणाले की, प्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष देऊन माजी मुख्यमंत्री बांदोडकर यांनी खऱ्या अर्थाने अत्याधुनिक गोव्याचा पाया रोवला. भाऊसाहेबांचे योगदान आणि ज्ञान भावी पिढीला राज्याच्या विकासासाठी प्रेरणा देत राहील. भाऊसाहेबांच्या मिरामार येथील समाधीच्या नूतनीकरणाचे काम सरकारने हाती घेतले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे त्याठिकाणी जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला नाही. पुढील वर्षापर्यंत नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बांदोडकर जयंतीनिमित्त तेथे कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.