माय मराठीसाठी एकसंध व्हा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर; डिचोलीत मराठी निर्धार मेळाव्याला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:28 IST2025-06-08T08:27:51+5:302025-06-08T08:28:44+5:30

मायमराठीवर आजवर खूप अन्याय झाला. आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे.

be united for my marathi said subhash velingkar | माय मराठीसाठी एकसंध व्हा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर; डिचोलीत मराठी निर्धार मेळाव्याला प्रतिसाद

माय मराठीसाठी एकसंध व्हा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर; डिचोलीत मराठी निर्धार मेळाव्याला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: मायमराठीवर आजवर खूप अन्याय झाला. आता निर्णायक लढाईची वेळ आली आहे. मराठीप्रेमी ८० टक्के असूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे यापुढे व्होट बँकेद्वारे दबाव आणूया व मराठी राजभाषा मागणीला मान्यता देणार त्यालाच मत देणार, असा निर्धार करूया, असे आवाहन प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी डिचोली येथील मराठी निर्धार मेळाव्यात केले.

कोकणी राजभाषा आहेच, माय मराठीला न्याय देण्यासाठी मतदान हे शस्त्र म्हणून वापरूया. मतदान हा शेवटचा निर्वाणीचा निर्धार आहे. आजपर्यंत राजकीय नेत्यांनी कोणी किती कल्याण केले ते सर्वांना माहीत आहे. मराठी शाळा बंद करण्याचे कारस्थान सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी राजभाषा करण्याचा निर्धार केला होता. मात्र काहीच घडले नाही. माजी आमदार नरेश सावळ यांनी विधेयक मांडले होते. पण ते गुंडाळण्यात आले, असे वेलिंगकर म्हणाले.

मराठी राज्यभाषा निर्धार समिती गोवा मराठीप्रेमींचा डिचोली प्रखंड मेळावा येथील तारी सभागृहात आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर, गोपाळ रा. ढवळीकर, मुकुंद कवठणकर, शाणुदास सावंत, बाबूसो सावंत, सुबोध मोने, सायली गर्दै व इतर उपस्थित होते.

एक गठ्ठा मतांसाठी इंग्रजीला अनुदान

इंग्रजीला अनुदान देताना एक गठ्ठा मतांसाठी मराठी मातृभाषेला विकण्यात आले. आता ताकद निर्माण केली पाहिजे. यावेळी मराठी राजभाषा झालीच पाहिजे. माझी आई माय मराठीसाठी संघटित राहा. कारण, मराठी भाषा राष्ट्रीय स्वाभिमानाचे संस्कृतीच, राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृती गोव्यात नांदते आहे, त्या संस्कृतीशी प्रतारणा करण्यासाठी सरकारकडून गद्दारी सुरू आहे. मराठी शाळा बंद करणे हे अयोग्यच आहे.

युवा पिढीने सहभागी व्हावे : गो. रा. ढवळीकर

ज्येष्ठ मराठीप्रेमी नेते गो. रा. ढवळीकर यांनी मराठी राज्य भाषा होणे का गरजेचे आहे? हा विचार सर्वांना कळावा, हा उद्देश आहे. मराठी रक्षणासाठीची ही चळवळ केवळ युवा पिढीला तरण्यासाठी आहे. उत्तम समाज घडवण्यासाठी मराठी भाषेचा सर्व प्रकारे गोव्यात वापर करताना युवा पिढीने ती उचलून घेणे गरजेचे आहे, असेही ढवळीकर म्हणाले. मराठी राजभाषा झालीच पाहिजे, अशी घोषणा देत त्यांनी मराठीसाठी संघटित राहण्याचे आवाहन केले.

डिचोली समिती जाहीर

यावेळी अध्यक्ष - बाबूसो सावंत, उपाध्यक्ष - अरविंद सायनेकर, समन्वयक - मुकुंद कवठणकर, सचिव -ओंकार केळकर, कोषाध्यक्ष - नितीन मळगावकर व इतर सदस्यांची समिती घोषित केली. सायली गर्दै हिने मार्गदर्शन करताना भाषा संस्कृतीची ओळख याबाबत माहिती दिली.
 

Web Title: be united for my marathi said subhash velingkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.