बाणस्तारी अपघात प्रकरण; अमित पालेकर यांना क्लीन चीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:26 IST2023-12-14T15:24:56+5:302023-12-14T15:26:03+5:30
पुरावे नष्ट करण्याचा उल्लेख वगळला

बाणस्तारी अपघात प्रकरण; अमित पालेकर यांना क्लीन चीट
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : तिघांचा बळी घेणाऱ्या बाणस्तारी येथील भीषण अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या आरोपातून आम आदमी पार्टीचे नेते अॅड. अमित पालेकर यांना क्लीन चीट मिळाली आहे. त्यांच्यावरील आरोप वगळण्यात यावेत, अशी याचिका म्हार्दोळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी उच्च न्यायालयात केली होती.
हे प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे सोपविल्यानंतर क्राईम ब्रँचकडून या अपघात प्रकरणातील संशयित परेश सावर्डेकर यांच्याबरोबरच आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांच्यावरही गुन्हा नोंदविला होता. पुरावे नष्ट करण्याचे काम पालेकर यांनी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. हे काम त्यांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकात केल्याचे पालेकर यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना म्हटले होते.
परंतु क्राईम ब्रँचचा हा दावा खुद्द म्हार्दोळचे तत्कालीन निरीक्षक मोहन गावडे यांनीच फेटाळून लावल्यामुळे क्राईम ब्रँच तोंडघशी पडले आहे. पालयेकर यांच्या जामीन आदेशावर नमूद असलेला ५४ क्रमांकचा उतारा वगळण्यात यावा असे त्यांनी याचिकेत म्हटले होते. म्हार्दोळ पोलिस स्थानकात पालयेकर यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख या उताऱ्यात होता. तोच वगळण्याची मागणी केली होती. म्हत्त्वाचे म्हणजे क्राईम ब्रँचनेही त्याला नंतर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आदेश जारी करताना तो उतारा वगळला आहे. यामुळे अॅड पालेकर यांना क्लीन चीट मिळाली आहे.