सामूहिक धर्मांतरावर बंदी घाला!
By Admin | Updated: January 21, 2015 02:08 IST2015-01-21T02:07:19+5:302015-01-21T02:08:58+5:30
एदुआर्द फालेरो यांची मागणी

सामूहिक धर्मांतरावर बंदी घाला!
पणजी : आमिषे देऊन करण्यात येणाऱ्या सामूहिक धर्मांतरावर बंदी घालण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी केली आहे.
कॉंग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवाराने मोठ्या प्रमाणावर लोकांची धर्मांतरे सुरू केली आहेत. आग्रा येथे २०० मुस्लिमांचे करण्यात आलेले धर्मांतर हे ताजे उदाहरण आहे. या लोकांना दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डे, घरे, अन्न तसेच शिक्षण व इतर गोष्टी देण्याची आमिषे दाखविण्यात आली होती. राष्ट्रीय माध्यमांनीही हा विषय उचलून धरला होता. ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात व हिमाचल प्रदेश या पाच राज्यांमध्येही धर्मांतरासंबंधी कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर करावयाचे असल्यास त्यामागची कारणे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट करावी लागतात. तसेच धर्मांतराची चौकशीही करण्याचे अधिकार या कायद्यानुसार आहेत. हा कायदा अमलात आल्यापासून धर्मांतराविरुद्ध तक्रारी नोंद झाल्या आहेत; परंतु कारवाई शून्य आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब घटकांच्या विकासासाठी सरकारने पावले उचलावीत; जेणेकरून या घटकांची आमिषे दाखवून धर्मांतरे होणार नाहीत, असे ते म्हणाले.
(प्रतिनिधी)