निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात बेकायदेशीर दारुच्या साठ्यावर धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:51 IST2019-03-29T20:51:02+5:302019-03-29T20:51:34+5:30
दहा दिवसांतच 2.60 कोटींचा माल जप्त : आंतरराज्य वाहतुकीसह स्थानिक विक्रेत्यांवरही कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात बेकायदेशीर दारुच्या साठ्यावर धडक कारवाई
मडगाव: लोकसभा निवडणुकीच्या तसेच गोव्यात होणा:या तीन विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीच्या पाश्र्र्वभूमीवर गोव्यातील अबकारी खाते व पोलिसांनी बेकायदा दारु विक्री विरोधात धडक मोहीम सुरु केली असून मागच्या दहा दिवसात तब्बल 2.60 कोटींचा माल जप्त केला आहे. गेल्या दहा दिवसात अशा एकूण 14 प्रकरणांची नोंद झाली असून त्यात 27 मार्च रोजी महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या धारगळ या भागातील तीन बेकायदेशीर गोदामावर धाड घालून तब्बल दीड कोटींची दारु पकडण्यात आली. अशाप्रकारे आंतरराज्य वाहतूक करणा:याबरोबरच पोलिसांनी स्थानिक व्यावसायिकांवरही बेकायदेशीर दारु साठवणुकीसाठी कारवाई केली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात तसेच गोव्याबाहेर अवैधरित्या दारुची वाहतूक सुरु झाल्याने ही कृती करण्यात आल्याचे समजते. यापूर्वी 19 मार्च रोजी गुजरातला रवाना होणारी तीन लाखांची बेकायदेशीर दारु बांदा चेक नाक्यावर पकडण्यात आली होती. तर तीन दिवसांतच म्हणजे 22 मार्च रोजी सावंतवाडी येथे अशाचप्रकारे अवैधरित्या दारु घेऊन जाणारा ट्रक पत्रदेवी येथे पकडून 40 हजाराची दारु जप्त केली होती.
दुसऱ्या बाजूने कर्नाटकच्या सीमेजवळ असलेल्या काणकोणातही अशा कारवाया झाल्या असून केपेचे पोलीस उपअधीक्षक किरण पोडुवाल यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोण येथे घातलेल्या धाडीत 30 लाखाची दारु पकडली होती. त्यापूर्वीही काणकोणात अशाचप्रकारे अवैधरित्या साठवून ठेवलेली 5 लाखाची दारु पकडण्यात आली होती.
म्हापसा येथे झालेल्या एका धडक कारवाईत महाराष्ट्रात जाणारा एक ट्रक थिवी येथे पकडून 71 लाखाची बेकायदेशीर दारु पकडली होती. ही कारवाई यापुढेही चालू रहाणार असून गोव्यातील अंतर्गत भागातही अशाप्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अबकारी खात्याकडून मिळाले आहेत.