लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : ज्या तरुणांनी माझ्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले त्यातील अनेक जण गॅम्बलिंगमध्ये आहेत. त्यामुळे त्या युवकांना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सरकारी किंवा खासगी नोकऱ्या मिळवून द्याव्यात. माझे कितीही पुतळे जाळले तरी आपण २०२७मध्ये पेडण्यातून निवडणूक लढविणारच, असा थेट इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांच्यासोबत धारगळचे माजी सरपंच अर्जुन कोनाडकर, आबा तळकटकर उपस्थित होते.
आजगावकर म्हणाले की, या मतदारसंघात आपण २० वर्षापासून काम करत आहे. तळागाळातील लोकांच्या समस्या आपल्याला माहिती आहेत. मतदारसंघात काम केले म्हणूनच आपण चार वेळा निवडून आलो आणि यापुढेही लोक आपल्याला साथ देतील, असा विश्वास आजगावकर यांनी व्यक्त केला. पेडणे मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलणाऱ्या आमदारांनी रवींद्र भवन, क्रिकेट स्टेडियमचा प्रश्न का सोडविला नाही, असा प्रश्नही आजगावकर यांनी उपस्थित केला.
यावेळी आजगावकर यांनी पुतळा जाळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली. पेडणे मतदारसंघातील पाणी प्रकल्प, रस्त्यांच्या दुरुस्तीसह दुसरा विस्तारित पाणी प्रकल्प आपण आणल्याचा दावा करून आजगावकर यांनी आर्लेकरांना लक्ष्य केले. ज्यांनी पुतळा जाळण्यास सांगितला त्यांनी युवकांच्या भविष्याशी खेळू नये. युवकांना पुतळा जाळण्यासाठी सांगणाऱ्या आमदारांनी त्यांच्या भल्याचा विचार करावा, त्यांना नोकरी, उद्योग-व्यवसायात मदत करावी, असा टोलाही आजगावकरांनी लगावला. ज्या पद्धतीने युवकांचा वापर करून आपला पुतळा जाळला हे निषेधार्ह आहे. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, असे सांगत आजगावकर यांनी आपण विधानसभा लढविणार असल्याचे सांगितले.