भररस्त्यावर तरुणावर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:13 IST2018-09-29T22:12:55+5:302018-09-29T22:13:09+5:30

The attack on the youth by the sword | भररस्त्यावर तरुणावर तलवारीने हल्ला

भररस्त्यावर तरुणावर तलवारीने हल्ला

वास्को : दुपारी मंगोरहील, वास्को येथील अंबाबाई मंदिराच्या बाहेरील रस्त्यावर महम्मद इशान (शाणू) ह्या ३० वर्षीय तरुणावर बायणा, वास्को भागात राहणाऱ्या इस्माईल शेख (कब्बू) ह्या तरुणाने सपासप तलवारीने हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्याच्या ह्या घटनेमुळे वास्को भागात भितीचे वातावरण पसरले आहे. 


इस्माईल त्याचा भाऊ नवाज शेख व अन्य एका अज्ञाताबरोबर दुचाकीने मंगोरहील येथे महम्मद याच्या गॅरेजसमोर आल्यानंतर त्यांने त्याला बोलवून तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी महम्मद पळाला असता त्याच्या मागे पळून सुद्धा त्याच्यावर आणखीन हल्ले करून नंतर संशयित आरोपी इस्माईल व त्याच्याबरोबर आलेला त्याचा भाऊ व त्या अज्ञाताने घटनास्थळावरून पोबारा काढला. ह्या तलवार हल्यात महम्मद याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला असून येथे असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला नंतर त्वरित उपचारासाठी चिखलीच्या कुटीर रुग्णालयात नेला.


भरदुपारी तलवारीने हल्ला केलेल्या संशयित इस्माईल याचे यापूर्वी गुन्होगारीशी नाते जुळलेले असल्याचे तपासणीच्या वेळी उघड झालेले असल्याची माहीती उपअधीक्षक सावंत यांनी दिली. यापूर्वी इस्माईल विरुद्ध चार प्रकरणे नोंद झाल्याचे तपासात उघड झालेले असल्याची माहीती सावंत यांनी पुढे दिली. दरम्यान ह्या प्रकरणात पोलीसांनी इस्माईल व त्याच्या साथिदाराविरुद्ध महम्मद याला जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ३०७ कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याचे सावंत यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक निहंदा तावारीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The attack on the youth by the sword