अटल सेतू अखेर वाहतुकीस खुला; काय म्हणाले मुख्यमंत्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 09:45 IST2023-04-17T09:44:02+5:302023-04-17T09:45:02+5:30
पुलावरील डांबरीकरणाचा संपूर्ण थर काढून पारंपरिक पद्धतीने नव्याने डांबर टाकण्यात आले आहे.

अटल सेतू अखेर वाहतुकीस खुला; काय म्हणाले मुख्यमंत्री...
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: अटल सेतूची डागडूजी, तसेच हॉट मिक्सिंगचे काम पूर्ण झाल्याने आज, रविवारी दुपारी या पुलाच्या सर्व लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. अटल सेतू डागडूजीनिमित्त बंद राहिल्याने गेला महिनाभर पर्वरी आणि पणजीवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पुलाची डागडूजी पूर्ण झाल्याने व तो वाहतुकीस खुला केल्याने लोकांना मोठा दिलासा ठरला आहे. पलाच्या सर्व लेन सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळीच केली होती. त्यानंतर तो दुपारी खुला करण्यात आला. पुलाच्या रिसर्फेसिंगच्या कामात लोकांनी दाखवलेला संयम आणि सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी झालेल्या गैरसोयीबद्दल खेदही व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गेल्या महिनाभरात कठोर परिश्रम घेतलेल्या कामगारांचे, जीएसआयडीसीचे आणि कंत्राटदारांचे मी काम वेगाने पूर्ण केल्याबद्दल आभार मानतो. पुलावरील डांबरीकरणाचा संपूर्ण थर काढून पारंपरिक पद्धतीने नव्याने डांबर टाकण्यात आले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री ....
- सावंत म्हणाले की, अटल सेतूसाठी वापरलेले तंत्रज्ञान प्रगत आहे. यात कंत्राटदारांचा दोष नाही. पूर्वीचा थर काढून नवा थर टाकणे हे तांत्रिक काम खूप मेहनत घ्यावे लागणारे व वेळखाऊ होते. अनेक महिन्यांपासून, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ दोष शोधून काढण्यात धडपडत होते. अखेर आयआयटी, मद्रासने दोष दाखवून दिला. तीन सदस्यीय चमूने अनेक आठवडे साइटवर अनेक चाचण्या केल्या.
- चेन्नई येथील प्रयोगशाळांमध्ये नमुने देखील तपासण्यात आले. हवामानात सामग्री योग्य नाही आणि काँक्रीट आणि डांबर यांच्यातील बाँडिंग सदोष आहे, ज्यामुळे डांबराचे तुकडे सोलून खड्डे पडत होते, असे निदर्शनास आले. यावर आता उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"