अर्चनाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने विजयराजला घेरले होते!
By Admin | Updated: September 5, 2014 01:31 IST2014-09-05T01:31:55+5:302014-09-05T01:31:55+5:30
सुशांत कुंकळयेकर/सूरज पवार ल्ल मडगाव अर्चना देसाई हिच्या मृत्यूला जबाबदार ठरविलेल्या डॉ. विजयराज देसाई याला संशय पिशाच्चाने घेरले होते. आपली पत्नी अर्चना हिचे इतरांशी अनैतिक संबंध आहेत,

अर्चनाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयाने विजयराजला घेरले होते!
सुशांत कुंकळयेकर/सूरज पवार ल्ल मडगाव
अर्चना देसाई हिच्या मृत्यूला जबाबदार ठरविलेल्या डॉ. विजयराज देसाई याला संशय पिशाच्चाने घेरले होते. आपली पत्नी अर्चना हिचे इतरांशी अनैतिक संबंध आहेत, असे त्याला सारखे वाटत होते. संशयिताच्या भावानेच सीबीआयला दिलेल्या जबाबात विजयराजने आपल्या पत्नीचे संबंध तिच्या भावाशी, दिराशी व सासऱ्याशीही लावण्यास मागेपुढे पाहिले नव्हते. अर्चनानेही लिहिलेल्या एका पत्रात हे सर्व नमूद केले आहे.
सीबीआयच्या दाव्याप्रमाणे, अर्चनाचा काटा काढण्यामागे हेही एक कारण होते. हे कारस्थान रचण्यापूर्वी संशयिताने जून २0१0 मध्ये आपले मडगावचे घर सोडून आगशी येथे एक घर भाड्याने घेतले होते. आपली पत्नी व दोन्ही मुलांसह तो या घरात राहायला गेला. त्याने आपल्या मुलांनाही पूर्वीच्या शाळेतून काढले होते. आपल्या मुलीला आपल्या कार्यालयाजवळ असलेल्या शाळेत, तर मुलाला अर्चना शिकवीत असलेल्या कन्नड माध्यमातील शाळेत दाखल केले होते. या शाळेतील शिक्षकांनी सीबीआयला दिलेल्या माहितीप्रमाणे, अर्चनावर लक्ष ठेवण्यासाठी विजयराजने आपला मुलगा हर्षल याला या शाळेत दाखल केले होते. नोव्हेंबर २0१0 मध्ये त्यांनी परत मडगावात राहायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच अर्चना गायब होण्याची घटना घडली. विजयराजच्या शेजाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे, तो आपल्या शेजाऱ्यांपासून दूर राहायचा व आपली पत्नी व मुलांनाही शेजाऱ्यांमध्ये मिसळू देत नव्हता. आपल्या घरात काय चालू आहे याचा थांगपत्ता दुसऱ्यांना लागू नये यासाठीच त्याने ही खबरदारी घेतली असावी, असा सीबीआयचा दावा आहे.
विजयराजच्या दोघा शेजाऱ्यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात डिसेंबर २0१0च्या पहिल्या आठवड्यात विजयराजच्या घरी मोठमोठ्याने भांडण चालू असल्याचा आवाज येत होता. त्यानंतर अर्चनाच्या रडण्याचाही आवाज ऐकू येत होता; पण दुसऱ्या दिवसापासून अर्चना कुणालाही दिसली नाही व त्यांच्या घरातून भांडणाचा आवाजही कुणाला ऐकू आला नाही. आपल्या मुलांची मते अर्चनाविषयी कलुषित व्हावी यासाठी डॉ. विजयराज त्यांच्यासमक्षच अर्चनावर तिच्या चारित्र्याबद्दल संशय घेणारे आरोप करायचा. आपल्या आईबद्दल मुलांमध्ये अविश्वास त्याने निर्माण केला होता. शाळेत शिकत असताना त्याचा मुलगा आपल्या आईवरच पहारा ठेवत होता यावरून ते सिद्ध होते, असा सीबीआयचा दावा आहे. अर्चना गायब झाल्यानंतर १४ डिसेंबर २0१0 पर्यंत विजयराजने आपला मुलगा हर्षलला शाळेत पाठविले नाही. त्यानंतर १४ डिसेंबरला त्याने मुलाला शाळेतून काढण्यासाठी अर्ज दाखल केला. अर्चना कुठे गायब झाली आहे हे कदाचित इतर शिक्षिका विचारतील या भयानेच संशयिताने ही कृती केली असावी, असा सीबीआयचा दावा आहे. ५ डिसेंबर २0१0 ते ४ जुलै २0११ या कालावधीत अर्चनासंदर्भात विचारपूस करण्यासाठी तिच्या शाळेतून कित्येक रजिस्टर पत्रे व टेलिग्राम तिच्या पत्त्यावर पाठविले गेले. मात्र, प्रत्येक वेळी डॉ. विजयराजने ही पत्रे व टेलिग्राम स्वत: अर्चनाच स्वीकारील, असे सांगून पोस्टमनला परत पाठविले. ही सर्व कृती पाहाता अर्चनाचे नेमके काय झाले आहे याची डॉ. विजयराजला पूर्ण कल्पना होती. यामुळे अर्चनाचा मृत्यू ही आत्महत्या नसून तो जाणूनबुजून केलेला खून असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.