विकासविरोधी वृत्ती मारक!; मयेतील कॉलेज विरोधामुळे मुख्यमंत्री संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 12:20 IST2025-02-13T12:19:41+5:302025-02-13T12:20:38+5:30
प्रकल्पांना विरोध न करण्याचे ग्रामस्थांना आवाहन

विकासविरोधी वृत्ती मारक!; मयेतील कॉलेज विरोधामुळे मुख्यमंत्री संतापले
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : कायदा महाविद्यालयासारख्या प्रकल्पाला काहीजण विरोध करतात याचा कडक शब्दांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल समाचार घेतला. अशा प्रकल्पांना विरोध म्हणजे विकासाला विरोध असा अर्थ होतोय, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगून ही मानसिक वृत्ती गावच्या हितासाठी मारक असल्याचे म्हणाले. सरकारी जमिनीवर कॉलेज येत असेल तर मयेवासीयांनी विरोध करू नये. विरोध केल्यास गावचा विकास कसा होईल? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आक्रमक होत विचारला. आम्ही प्रकल्प होऊच देणार नाही म्हणजे काय? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मयेवासीयांना विचारला आहे.
मये मतदारसंघात सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून कृषी, वीज, पर्यटनासह विविध प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल, बुधवारी डिजिटल पद्धतीने पायाभरणी करण्यात आली. मये पंचायत सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच कृष्णा चोडणकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर, महेश सावंत, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दयानंद कारबोटकर, मंडळ समिती पदाधिकारी, विविध पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य, भाजप पदाधिकारी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
मये हा ग्रामीण मतदारसंघ असला, तरी येथील हरितक्रांती, निसर्ग हा जगाला खुणावत असतो. त्यामुळे शेती बागायती, दूध उत्पादन क्षेत्रात नव्या पिढीने या ठिकाणी पारंपरिक शेतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सरकार त्यासाठी सर्व सहकार्य देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड हे अकारण राजकारण करून दिशाभूल करीत असून, त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वास चोडणकर यांनी स्वागत केले.
प्रत्येक मतदारसंघात ५०० कोटींहून अधिक विकासाच्या योजना डबल इंजिन सरकार राबवत आहेत. त्यामुळे चांगल्या गोष्टींना ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. सहकार्य केले तर अनेक चांगले प्रकल्प आणून प्रत्येक मतदारसंघाचा कायापालट करणे शक्य असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण व जागतिक स्तरावर भरारी घेण्याची संधी युवा पिढीला मिळणार आहे. त्यामुळे विरोध करण्याची मनोवृत्ती सोडून द्या व सरकारच्या विकास प्रकल्पांना सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या फलोत्पादन महामंडळाच्या कामगिरीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मतदारसंघात सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आतापर्यंत २०० प्रकल्प मार्गी लावण्यास प्रेमेंद्र शेट यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदनही केले.
तुम्हीच सांगा, विकास करायचा तरी कसा?
मयेतील नव्या पिढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कायदा महाविद्यालयासह इतर प्रकल्प राबविण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्याला स्थानिकांनी जर सहकार्य केले नाही, तर गावचा विकास होणार तरी कसा?
काँग्रेस, गोवा फॉरवर्डने राज्यात काय दिवे लावले?
गोवा फॉरवर्ड व काँग्रेसवाल्यांनी राज्यात काय दिवे लावले, हे सर्वांना माहिती आहे. मयेवासीयांना खरे स्वातंत्र्य देण्यासाठी भाजपचे डबल इंजिन सरकार सातत्याने कार्यरत आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेल्यांना सनदा बहाल झालेल्या आहेत. शेती व इतर बाबींच्या सनदाही मिळतील. नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण व जागतिक स्तरावर भरारी घेण्याची संधी युवा पिढीला मिळणार आहे. त्यामुळे विरोध करण्याची मनोवृत्ती सोडून प्रकल्पांना सहकार्य करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.