लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कोळसाविरोधात सुरू असलेल्या चळवळीला काल रविवारी मडगाव येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेतून आणखी बळकटी मिळाली. लोहिया मैदानावर घेण्यात आलेल्या जाहीर सभेत विविध गावांतील ग्रामस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे राज्यातील कोळसा आयात, हाताळणी आणि वाहतुकीला कडाडून विरोध दर्शवला. सभेला राज्यभरातील सुमारे एक हजार लोकांनी उपस्थिती लावत विरोध दर्शवला. राज्याच्या नैसर्गिक संपन्नतेची नासधूस करू नये, असे आवाहन सभेत करण्यात आले.
सभेला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, हळदोणेचे आमदार कार्लोस फेरेरा, सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर, आम आदमी पक्ष राज्य निमंत्रक अमित पालेकर, आरजी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब, फॉरवर्डचे सदस्य दुर्गादास कामत, विकास भगत, माजी पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा, 'गोयांत कोळसो नाका' सभेचे निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई आणि इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित प्रभूदेसाई यांनी पावर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे सरकार कशाप्रकारे राज्यात आणखीन कोळसा आणू पाहत आहे आणि रेल्वे दुपदरीकरणाने गोव्याच्या निसर्गावर आणि लोकांच्या आरोग्यावर कसा वाईट परिणाम होईल, याविषयी माहिती दिली.
मुख्य वक्ते डॉ. जोर्सन फर्नाडिस म्हणाले, की विविध विषारी रसायने मनुष्याच्या शरीरावर जीवघेणे परिणाम करतात. त्यामुळे गोव्यात कोळसा हाताळणीला विरोध होणे गरजेचे आहे.
गोव्यात जो कोळसा आणला जात आहे आणि हे जे रेल्वे दुपदरीकरण होत आहे त्याचा फायदा इतर राज्यांना आणि काही लोकांना होणार आहे. पण, या प्रकल्पामुळे गोव्यातील लोकांना त्रास आणि पर्यावरणीय हानी सहन करावी लागत आहे. - कार्लोस फेरेरा, आमदार.
आज जी कोळसाविरोधी जाहीर सभा झाली त्यात राज्यभरातील लोक उपस्थित होते. या सभेच्या आयोजकांनी या चळवळीची धुरा युवकांच्या हाती दिलेली दिसत असून, युवावर्ग कोळसा आणि विघातक प्रकल्पांच्या विरोधात लढा देण्यास उभे आहेत. गोव्यातून जर कोळसा काढून टाकायचा असेल तर हे विद्यमान भाजप सरकार घरी पाठवले पाहिजे. आम्ही विरोधीपक्ष सर्व एकजुटीने हे सरकार पाडण्यास पुढे येऊ. लोकांनीही आम्हाला सहकार्य करावे. - विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा.
सध्याचे सरकार हे लोकांच्या आवाजाला आणि त्यांच्या इच्छेला जुमानत नाही. लोकांनी कित्येक वेळा विघातक प्रकल्पांना विरोध करूनही सरकार आपल्याला पाहिजे तेच करत आहे. या सर्व गोष्टी लोकांनी लक्षात घेऊन काय तो निर्णय घेतला पाहिजे. - वीरेश बोरकर, आमदार सांत आंद्रे.
आजच्या जाहीर सभेतून हे सिद्ध झाले की कोळसा वाहतूक आणि रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प या गोष्टी फक्त काही लोकांनाच त्रासदायक ठरतात असे नाही, तर राज्यातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागातही त्याचा वाईट परिणाम दिसतो. आम आदमी पक्ष हा या लढ्यात लोकांसोबत असेल. -अमित पालेकर, आम आदमी पक्ष अध्यक्ष.
गोव्यातील विद्यमान सरकार हे राज्यात कोळसा आणण्यास इच्छुक असून, ते विविध प्रकल्प आणत आहेत. पुढील दीड वर्षात राजकीय बदल होऊन आमचे सरकार आले पाहिजे. आम्ही कोळसा धोरणच बदलून गोव्यात कोळसा येणे बंद करू. पण, त्यासाठी लोकांनी विचारपूर्वक मतदान केले पाहिजे. - मनोज परब, आरजी पक्ष अध्यक्ष
Web Summary : Goa citizens and leaders united against coal import and railway doubling, citing environmental and health concerns at a Madgaon rally. Speakers highlighted the projects' adverse impacts, urging political change to protect Goa's natural resources and public health.
Web Summary : मडगांव में कोयला आयात और रेलवे दोहरीकरण के खिलाफ नागरिकों और नेताओं ने एकजुट होकर पर्यावरण और स्वास्थ्य संबंधी चिंताएं व्यक्त कीं। वक्ताओं ने परियोजनाओं के प्रतिकूल प्रभावों पर प्रकाश डालते हुए गोवा के प्राकृतिक संसाधनों और सार्वजनिक स्वास्थ्य की रक्षा के लिए राजनीतिक परिवर्तन का आग्रह किया।