महामार्गावर पुन्हा एकदा अपघात; व्यवसायिक प्रदीप नार्वेकर यांचे निधन
By काशिराम म्हांबरे | Updated: October 16, 2023 11:29 IST2023-10-16T11:29:32+5:302023-10-16T11:29:56+5:30
याच महामार्गावर मागील दिड महिन्यात घडलेला हा तिसरा अपघात आहे.

महामार्गावर पुन्हा एकदा अपघात; व्यवसायिक प्रदीप नार्वेकर यांचे निधन
म्हापसा-पणजी राष्ट्रीय महामार्गावर गिरी येथे हीट अॅण्ड रन अपघातात म्हापसा शहरातील व्यवसायिक प्रदीप नार्वेकर यांचे निधन झाले आहे. याच महामार्गावर मागील दिड महिन्यात घडलेला हा तिसरा अपघात आहे.
सदरची घटना रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. नार्वेकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या चारचाकी वाहनाने नार्वेकरांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते दुचाकीवरून खाली कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रुग्णालयात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
प्राथमिक माहितीनुसार ती गाडी एका महिलेच्या नावावर असून गाडी अपघातावेळी सदरची गाडी एक वकील चालवत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपासकार्य म्हापसा पोलिसांच्या वतिने सुरु करण्यात आले आहे. पोलीस वाहन चालकाच्या मागावर आहेत.