अनिल खंवटे यंदाचे 'गोवन ऑफ द इयर'चे मानकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2024 13:17 IST2024-02-27T13:15:38+5:302024-02-27T13:17:22+5:30
मिरामार येथील मॅरियॉट हॉटेलमध्ये उद्या, बुधवारी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास गोवन ऑफ द इयर हा पुरस्काचा सोहळा होणार आहे.

अनिल खंवटे यंदाचे 'गोवन ऑफ द इयर'चे मानकरी!
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'लोकमत' मीडियातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'गोवन ऑफ द इयर जीवन गौरव' पुरस्कार यंदा गोव्यातील आघाडीचे उद्योगपती अनिल खंवटे यांना देण्यात येणार आहे.
उत्कृष्ट विधिमंडळपटू (बेस्ट लेजिस्लेटर) पुरस्कार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एमर्जिंग पॉलिटिशयन पुरस्कार डॉ. दिव्या राणे, आयपीएस विभागात पोलिस महासंचालक जसपाल सिंग तर आयएएस विभागात शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पत्रकारितेतील दखलपात्र कार्यासाठीचा पुरस्कार 'हेराल्ड' पब्लिकेशनचे मालक राउल फर्नाडिस यांना प्रदान करण्यात येणार आहे.
अॅड. रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखालील ज्युरी मंडळात पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर, राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर, लोकवेदाचे अभ्यासक डॉ. पांडुरंग फळदेसाई, उद्योजक संजय शेट्ये, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, लोकमतचे निवासी संपादक सदगुरु पाटील यांचा समावेश होता.
मिरामार येथील मॅरियॉट हॉटेलमध्ये उद्या, बुधवारी सायंकाळी साडेपाच सहाच्या सुमारास गोवन ऑफ द इयर हा पुरस्काचा सोहळा होणार आहे. इम्पॅक्टफुल पोलिस ऑफिसर, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य, पर्यावरण, बेस्ट हॉर्टिकल्चरिस्ट, क्रीडा, कला व संस्कृती, स्टार्टअप या विभागातील पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली होती. गुगल फॉर्मसद्वारे झालेले मतदान आणि ज्युरी मंडळाच्या निर्णयाद्वारे हे पुरस्कार दिले जाणार असून ते उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, सोहळ्यात गोवा व्हिजन २०५० या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यात नामांकित उद्योगपती सहभागी होणार आहेत.