भीवपाची गरज ना; केंद्रीय नेत्यांचा सल्ला, अमित शाह यांनी केले ढवळीकरांना आश्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:52 IST2025-04-03T12:51:35+5:302025-04-03T12:52:04+5:30

माझी दिशाभूल नाही : मुख्यमंत्री

amit shah reassures dhavalikar brother about alliance in goa | भीवपाची गरज ना; केंद्रीय नेत्यांचा सल्ला, अमित शाह यांनी केले ढवळीकरांना आश्वस्त

भीवपाची गरज ना; केंद्रीय नेत्यांचा सल्ला, अमित शाह यांनी केले ढवळीकरांना आश्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप व मगो अशी युती कायम राहील, २०२७ च्या निवडणुकीपर्यंत तरी युती तुटणार नाही, असे आश्वासन भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून मगो पक्षाच्या गोव्यातील नेत्यांना मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे फोनवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशीही बोलले आहेत. युतीविषयी चिंतेचे कारण नाही, असे शाह व सरचिटणीस बी. एल. संतोष यांनीही ढवळीकर यांना सांगून आश्वस्त केल्याची माहिती प्राप्त झाली.

सुदिन ढवळीकर व मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे मंगळवारीच दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांना भेटले. हे नेते दिल्लीला पोहचले आहेत, याची कल्पना गोव्यातील बहुतांश मंत्री व आमदारांना नव्हतीच. संतोष यांनी ढवळीकर यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिवाय शाह यांची सुदिन ढवळीकर यांच्याशी फोनवर बोलणी झाली. येत्या दि. ११ एप्रिल नंतर कधीही ढवळीकर पुन्हा दिल्लीला जाऊ शकतात, अशी माहिती मिळते. मात्र युती कायम राहील असे केंद्रातील भाजप नेत्यांनी ढवळीकर यांना सांगितले आहे.

दरम्यान, गोव्यात हिंदू मतांची आणखी विभागणी व्हायला नको, असे केंद्रीय नेत्यांना वाटते. २०१७साली गोव्यात भाजपला फक्त तेरा जागा मिळाल्या होत्या याची कल्पना केंद्रीय नेत्यांना गोव्यातीलच काही भाजपवाल्यांनी नव्याने दिली आहे.

माझी दिशाभूल नाही : मुख्यमंत्री

माध्यमांनी आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना दीपक ढवळीकर यांच्या ताज्या विधानाविषयी विचारले. मुख्यमंत्र्यांची कुणी तरी युतीबाबत दिशाभूल केली, असे दीपक ढवळीकर बोलले होते. त्यावर आपली कुणीही दिशाभूल केलेली नाही एवढीच प्रतिक्रिया मुख्यमंत्र्‍यांनी व्यक्त केली.

आधी सर्वेक्षण होणार, नंतर जागांचे वाटप!

मगोपने प्रियोळ मतदारसंघावर दावा केलेलाच नाही. निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत. २०२७ ची विधानसभा निवडणूक युतीनेच लढवू, असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आमच्याकडे स्पष्ट केलेले आहे. सर्वेक्षण होईल व नंतर जागा ठरतील, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी 'लोकमत'ला सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एल. संतोष यांची दिल्लीत भेट घेऊन आज, बुधवारी सकाळीच ढवळीकर बंधू गोव्यात परतले.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी प्रियोळमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मांद्रे व प्रियोळ दोन्ही मतदारसंघ भाजप लढवणार, असे जाहीर करताना युती मान्य नसेल तर चालते व्हा, असा इशारा दिला होता. त्यानंतर दीपक व मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्ली गाठली व बी. एल. संतोष यांच्याशी युतीच्या प्रश्नावर चर्चा केली.

आज सकाळी गोव्यात परतल्यानंतर दीपक यांच्याशी संपर्क साधला असता दिल्लीभेटीबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर संतोष यांच्याकडून आम्ही युती अस्तित्वात आहे की नाही हे जाणून घेतले. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेय की २०२७ ची विधानसभा निवडणूक युतीनेच लढवली जाईल. तत्पूर्वी मतदारसंघनिहाय सर्वेक्षण होईल व त्यानंतर जागा वाटप केले जाईल. निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. मगोपने प्रियोळवर दावा केलेला नाही. मुख्यमंत्र्यांची कोणीतरी दिशाभूल केली असावी त्यामुळेच त्यांच्याकडून हे विधान आले असावे.'

केंद्रीय समितीची लवकरच बैठक होणार

मगोपनेही आपल्या मतदारसंघांमध्ये काम सुरू ठेवले आहे. मतदारसंघांमध्ये समित्याही नेमलेल्या आहेत, त्याची घोषणा मे महिन्यात केली जाईल. पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक याच आठवड्यात होणार असून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाईल.

जीत यांनी आधी चांगली कामगिरी करून दाखवावी

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी अध्यक्षपदासाठी आपण पात्र असल्याचा दावा करून अध्यक्षपद आपल्याकडे सोपवले जावे, अशी जी मागणी केली आहे त्याबद्दल विचारले असता मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, आमदार जीत आरोलकर यांनी आधी पेडणे तालुक्यात चांगली कामगिरी करून दाखवावी. आगामी विधानसभा निवडणुकीत मगोपच्या तिकिटावर निवडून यावे. पेडणेचे माजी आमदार दिवंगत परशुराम कोटकर यांना तीच आदरांजली ठरेल. जीत यांनी चांगली कामगिरी करून दाखवल्यास आपोआप पक्ष त्यांच्या हातात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: amit shah reassures dhavalikar brother about alliance in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.