मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात अमेरिकन कंपनीची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 20:15 IST2018-03-09T20:13:50+5:302018-03-09T20:15:02+5:30
मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची तयारी अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन या कंपनीने दाखवली असून गोव्याच्या बाबतीत नुकतीच येथील नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे बोलणीही केली.

मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात अमेरिकन कंपनीची मदत
पणजी : मलेरिया निर्मुलनासाठी गोव्यासह देशभरात मदत करण्याची तयारी अमेरिकेच्या निओडॉक्टो फाउंडेशन या कंपनीने दाखवली असून गोव्याच्या बाबतीत नुकतीच येथील नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे बोलणीही केली. मलेरिया पसरविणाऱ्या डासांची निर्मिती कमी करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. गोव्यासह भारताच्या इतर भागातही मलेरिया उच्चाटनासाठी काम करण्याची तयारी या कंपनीने दाखवली आहे.
नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी ही बोलणी प्राथमिक स्वरुपाची असल्याचे सांगितले. मलेरिया निर्मुलनासाठी तज्ञांची सेवा ही कंपनी देणार आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी या कंपनीकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर केला जाईल. या सेवेच्या बदल्यात सरकार या संस्थेला काय मोबदला देणार, असे विचारले असता या सर्व गोष्टी अजून निश्चित व्हायच्या आहेत, असे डिसोझा यांनी सांगितले.
दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर सन्नीराप्पा यांनी दिल्लीत अशी माहिती दिली की, या उपक्रमांतर्गत मलेरियाबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणली जाईल तसेच खबरदारीच्या बाबतीतही त्यांना शिक्षित केले जाईल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अंदाजानुसार दक्षिण पूर्व आशियात जेवढी मलेरियाची प्रकरणे होतात त्यातील ७५ टक्के प्रकरणे भारतातील असतात. जगभरात मलेरियाचा फैलाव चिंतेचा विषय बनला आहे. लोकांमध्ये उपाययोजनांबाबत जागृतीबरोबरच मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचे अमेरिकेत मुख्यालय असून जगभरात ८१ राज्यांमध्ये शाखा आहेत. दरम्यान, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांशीही बोलणी केल्याचे वृत्त आहे.