गोमंतकीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर! गोव्याचे २२ वे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:13 IST2025-07-27T14:12:43+5:302025-07-27T14:13:45+5:30
नव्या राज्यपालांनी गोमंतकीयांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असेन, अशी ग्वाही दिली.

गोमंतकीयांच्या सेवेसाठी सदैव तत्पर! गोव्याचे २२ वे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी केंद्रीय मंत्री पुसापती अशोक गजपती राजू यांनी दोनापावला येथील राजभवनातील नवीन दरबार सभागृहामध्ये आयोजित सोहळ्यात शनिवारी गोव्याचे २२ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक अराडे यांनी पुसापती अशोक गजपती राजू यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी नव्या राज्यपालांनी गोमंतकीयांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असेन, अशी ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, आंध्र प्रदेश विधानसभेचे सभापती चिंताकायला अय्यन्नपात्राडू, आंध्र प्रदेशच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री गुम्मीदी संध्या राणी, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. या सोहळ्यात गोव्यातील मंत्री, आमदारांची मुख्यमंत्र्यांनी नवीन राज्यापालांना ओळख करून दिली.
यामध्ये सभापती रमेश तवडकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मंत्री विश्वजित राणे, रोहन खंवटे, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार गोविंद गावडे, डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रवीण आर्लेकर, जेनिफर मोन्सेरात, माजी मंत्री बाबू कवळेकर, आमदार उल्हास नाईक तुयेकर, संकल्प आमोणकर, केदार नाईक, कार्ल्स फेरेरा, वीरेश बोरकर, आंतोनियो वास, दाजी साळकर, नीलेश काब्राल, दिव्या राणे, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम व इतर मान्यवरांचा समावेश होता.
पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत आणि सामाजिक सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. २०१४ मध्ये त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून काम केले. त्याआधी १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेशातील विझीनगर मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आलेली. याशिवाय ते आंध्र प्रदेशातील प्रमुख ट्रस्ट 'मानसस' (महाराजा अलक नारायण सोसायटी ऑफ आर्ट्स अँड सायन्स) चे नेतृत्व करीत होते.
अनुभवाचा लाभ होईल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन राज्यपाल - पुसापती अशोक गजपती राजू यांना राजकारणासह सार्वजनिक क्षेत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. विशेषतः प्रशासकीय कामांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा गोवा राज्याला फायदा होईल. आपल्या स्वतःला त्यांच्याबरोबर काम करणे फार आवडेल.