आचारसंहिता संपताच मंत्र्यांना खात्यांचे वाटप, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 19:34 IST2019-05-10T19:33:58+5:302019-05-10T19:34:04+5:30
राज्यातील निवडणूक आचारसंहिता अगोदर संपूष्टात येऊ द्या. आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

आचारसंहिता संपताच मंत्र्यांना खात्यांचे वाटप, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
पणजी : राज्यातील निवडणूक आचारसंहिता अगोदर संपूष्टात येऊ द्या. आचारसंहिता संपल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. सर्व मंत्र्यांना अतिरिक्त खाती द्यावीत असे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ठरले होते.
मात्र लोकसभा निवडणुकीवेळी सर्व मंत्र्यांनी काम करायला हवे या अपेक्षेने खाते वाटप लांबणीवर टाकले गेले होते. खाते वाटप त्यावेळीच केले असते तर मनासारखी खाती मिळाली नाही म्हणून काही मंत्री नाराज झाले असते व कदाचित त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारांना दगाफटका केला असता. त्यामुळे खाते वाटप मुख्यमंत्र्यांनी स्थगित ठेवले होते याची कल्पना अनेक मंत्र्यांना आलेली आहे.
पत्रकारांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना खाते वाटपाच्या विषयाबाबत विचारले असता, अजून आचारसंहिता आहे ना, त्यामुळे आपण काही भाष्य करत नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर खाती देता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जीआरएसएफला पाठिंबा
दरम्यान, गोव्यातील रस्ता सुरक्षेसाठी काम करणा-या जीआरएसएफ ह्या एनजीओला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला व संस्थेचे कौतुक केले. संस्थेच्या वृत्त मासिकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले. यावेळी दिलीप नाईक, नारायण नावती, प्रमोद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, अपघातात कुणाचे बळी जाऊ नये म्हणून ही संस्था काम करते. त्यासाठी पदरमोडही करते. आपण रस्त्यांवर धोक्याची कल्पना देणारे फलक लागावेत म्हणून पाऊले उचलीन, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 80 टक्के रस्त्यांना साईनेजीस नाहीत आणि 90 टक्के गोमंतकीय वाहतूक नियमांचे पालनच करत नाहीत. यामुळे अपघात घडतात. यासाठी खूप जागृती होण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमातच वाहतूक नियम पालनाचे धडे असावेत. सर्व प्रकारच्या आपत्तींवेळी मदत करता यावी म्हणून 112 क्रमांकाच्या वाहिनीचे सरकार लवकरच गोव्यातही उद्घाटन करील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.