राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:33 IST2024-12-24T08:32:29+5:302024-12-24T08:33:08+5:30
पश्चिम बगलमार्गावरील २.७५ किलोमीटरचा भाग खुला

राजधानीला जोडणारे सर्व महामार्ग पाच वर्षांत पूर्ण होतील: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यातील शहरांना महामार्ग, उड्डाणपुलांच्या माध्यमातून राजधानी पणजीशी जोडले जाणार आहे. मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षांत पूर्ण होणार आहे. राज्याच्या सर्व सीमांवरून पणजी शहराला जोडणारे पत्रादेवी, मोले, काणकोण, केरी (सत्तरी) हे महामार्ग येत्या पाच वर्षांत पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. येथील पश्चिम बगलमार्ग प्रकल्पाच्या काही भागांचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पर्यावरणमंत्री अॅलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने राज्यात मूलभूत सुविधा आणि जनहितार्थ विविध प्रकल्प आणले आहेत. त्यातच सरकार राज्यात रस्ते आणि उड्डाणपूल उभारून शहरांना जवळ आणण्याचे काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून मडगाव ते काणकोण हा महामार्ग येत्या चार वर्षात पूर्ण होणार आहे. पश्चिम बगलमार्गाची एकूण लांबी १२ किलोमीटर आहे. त्यातील २.७५ किलोमीटरचा रस्ता लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून २४७ कोटी आणि राज्य सरकारकडून २३५ कोटी खर्च करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, की ऐन नाताळाच्या काळात अनेक पर्यटक दक्षिण गोव्यात येत आहेत. येथील रहदारी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली होती. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा बगलरस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. ही दक्षिण गोव्यातील लोकांसाठी नाताळाची भेट आहे.
अडीच कोटींची नुकसान भरपाई
राज्यात 'गुड गव्हर्नन्स वीक' सुरू आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली होती. याबाबत ते म्हणाले, की विविध प्रकरणांमध्ये लोकांना सरकारकडून नुकसान भरपाई देणे बाकी होते. अशा लोकांना सोमवारी २.५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. त्याचबरोबर वानरमारे समाजातील लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले.