आक्रमकता कायम
By Admin | Updated: September 3, 2014 01:15 IST2014-09-03T01:11:39+5:302014-09-03T01:15:08+5:30
पणजी : दिल्ली भेटीवरून नवे बळ घेऊन आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे अजून आक्रमक असून, त्यांनी पक्षातील स्वच्छता

आक्रमकता कायम
पणजी : दिल्ली भेटीवरून नवे बळ घेऊन आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे अजून आक्रमक असून, त्यांनी पक्षातील स्वच्छता मोहीम सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे. तसा निर्धार त्यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतानाही व्यक्त केला.
दिल्ली भेटीवेळी फर्नांडिस यांनी दोनवेळा गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांची व एकदा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांना गोव्यातील काँग्रेसशी निगडित सर्व विषयांची पूर्ण कल्पना आहे. त्यांना बरीच माहिती यापूर्वीचे राज्यपाल भारतवीर वांच्छू यांच्याकडूनही मिळाली असावी, असे फर्नांडिस म्हणाले. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनाही कल्पना होती; पण त्यांना कुणी तरी थोडी चुकीची माहिती दिली होती. आपण त्यांचे संशय दूर केले, असे फर्नांडिस यांनी नमूद केले. आपण प्रदेशाध्यक्ष या नात्याने काँग्रेसच्या घटनेनुसारच काम करत आहे. आपण एकही चूक केलेली नाही. सर्व गट समित्या विसर्जित करण्याचा अधिकार घटनेने प्रदेशाध्यक्षांना दिला आहे; पण तो अधिकारदेखील आपण एकतर्फी पद्धतीने वापरला नाही. आपण दिग्विजय सिंग व इतरांना कल्पना देऊनच निर्णय घेतला. गोव्यातील काँग्रेसमध्ये आता नव्या रक्तालाच वाव दिला जाईल. नवी व्यवस्था तयार करण्यासाठी जुनी व्यवस्था मोडावी लागते, असे फर्नांडिस म्हणाले. डिसेंबरमध्ये काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम संपुष्टात येईल. त्यानंतर गट समित्यांसाठी निवडणुका होतील. गट समित्या पूर्णपणे पक्षाच्या आमदारांच्या किंवा माजी आमदारांच्या नियंत्रणाखाली ठेवण्याची पद्धत आता निकालात निघेल. आमदारांना गट समित्यांच्या फेररचनेत पंचवीस टक्के स्थान असेल. पंचाहत्तर टक्के स्थान हे पक्षाला असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका या अगोदर फार्स ठरत होत्या, तसे आता होणार नाही. राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन-तीन उमेदवार तयार होतील. सर्व स्तरांवर नवी व्यवस्था काँग्रेसमध्ये अस्तित्वात येईल, असे फर्नांडिस यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)