दीड वर्षानंतर मुस्कान भेटली तिच्या आई-वडिलांना, भोपाळात मागत होती भीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:54 IST2019-02-11T22:53:58+5:302019-02-11T22:54:13+5:30
दीड वर्षापूर्वी मडगावच्या कोंकण रेल्वे स्टेशनवरून अपहृत करण्यात आलेल्या साडेपाच वर्षीय मुस्कानला शेवटी मागच्या शनिवारी तिचे आई-वडील भेटले,

दीड वर्षानंतर मुस्कान भेटली तिच्या आई-वडिलांना, भोपाळात मागत होती भीक
मडगाव: दीड वर्षापूर्वी मडगावच्या कोंकण रेल्वे स्टेशनवरून अपहृत करण्यात आलेल्या साडेपाच वर्षीय मुस्कानला शेवटी मागच्या शनिवारी तिचे आई-वडील भेटले, यावेळी तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. त्यामुळे भोपाळच्या मातृछाया या अनाथाश्रमातील वातावरणही काहीसे गलबलून गेले.
शनिवारी मुस्कानला भोपाळच्या बाल कल्याण समितीने तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तब्बल दीड वर्षानंतर आपल्या पालकांना आणि भावंडांना भेटणारी मुस्कान यावेळी हरपून गेली, असे भोपाळच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. दीड वर्षापूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावर आपल्या आईसह झोपलेल्या मुस्कानचे एका आरोपीने अपहरण केले होते. तो तिला नंतर भोपाळला घेऊन गेला होता. भोपाळला तो या लहानग्या मुस्कानकडून रेल्वेत भीक मागवून घेत होता.
अशीच मुस्कान भीक मागताना भोपाळ रेल्वेच्या बाल वाहिनी कार्यकर्त्यांच्या ती नजरेस पडल्याने तिला भोपाळच्या मातृछाया या आश्रमात ठेवण्यात आले होते. चार महिन्यापूर्वी मुस्कानला अपहृत केलेला आरोपी मडगाव रेल्वे पोलिसांना सापडल्यानंतर मुस्कानचाही पत्ता लागला होता. मात्र तिचे आई-वडील काही केल्या सापडत नव्हते. त्यामुळे पालकांपासून मुस्कानला दूरच रहावे लागले होते. मध्यंतरीच्या काळात मडगाव रेल्वे पोलिसांनी मुस्कानच्या आई-वडिलांचा छडा लावला. त्यानंतर तिला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरु झाली ती शनिवारी पूर्ण झाली.