लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण, पेडणे, कुंकळ्ळी व वाळपई या सहा पालिकांवर प्रशासक नियुक्त करणारा आदेश पालिका प्रशासन संचालनालयाने मंगळवारी काढला. या पालिकांची मुदत संपत आल्याने व निवडणुका मेअखेर होणार असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे.
राज्यातील एकूण अकरा पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी सांगे, मुरगाव, मडगाव, केपे व म्हापसा पालिकांची मुदत अजून संपलेली नाही. वरील सहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मार्चमध्ये अपेक्षित होत्या. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावानुसार त्या आता मे अखेरीस होणार आहेत. सध्या प्रभाग पुनर्रचनेचे काम चालू आहे.
डिचोली, कुडचडें-काकोडा, काणकोण व पेडणे पालिकांची मुदत काल, दि. ३१ मार्च रोजी संपली तर कुंकळ्ळी आणि वाळपई पालिकांची मुदत अनुक्रमे येत्या ५ एप्रिल आणि ८ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे राज्यपालांच्यावतीने पालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक ब्रिजेश मणेरकर यांनी हा आदेश जारी केला आहे. नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या तारखेनुसार तातडीने पदभार स्वीकारून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग पुनर्रचना प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संबंधित तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांची निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मामलेदारांना सहाय्यक निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मसुदा ७ एप्रिलपर्यंत (३ एप्रिल -सार्वजनिक सुट्टी आणि ५ एप्रिल -रविवार वगळून) संबंधित मामलेदार कार्यालये तसेच पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी या मसुद्याबाबत सूचना किंवा हरकती ७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित सादर कराव्यात, असे आवाहन आयोगाने केले आहे.
प्रभाग पुनर्रचना मसुद्यावर सूचना, हरकती मागवल्या
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी मसुदा जाहीर करून नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. प्रभाग फेररचनेत प्रत्येक पालिकेतील प्रभागांची संख्या आणि त्यांच्या भौगोलिक सीमा निश्चित केल्या जाणार आहेत.
तोपर्यंत जबाबदारी सांभाळणार
निवडणुका मे अखेरीस पार पडण्याची शक्यता असून त्यानंतरच नवीन पालिका मंडळे स्थापना होणार आहेत. तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वरील सहा पालिकांचा कारभार सुरू राहणार आहे. सरकारने नियुक्त केलेले प्रशासक संबंधित नगरपालिकांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत कारभार पाहणार असून, हे अधिकारी त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांबरोबरच अतिरिक्त जबाबदारी म्हणून ही कामे सांभाळतील.
असे आहेत प्रशासक
डिचोली पालिका : अक्षय पोतेकर (संचालक, पोलिस महासंचालक कार्यालय) यांची १ एप्रिलपासून नियुक्ती
कुडचडें-काकोडा पालिका : सागर गावडे (व्यवस्थापकीय संचालक, गोवा शिक्षण विकास महामंडळ) यांची १ एप्रिलपासून नियुक्ती
काणकोण पालिका : शंकर गावकर (सदस्य सचिव, कला अकादमी) यांची १ एप्रिलपासून नियुक्ती
पेडणें : श्रीकांत पेडणेकर (सहाय्यक अबकारी आयुक्त-१) यांची १ एप्रिलपासून नियुक्ती
कुंकळ्ळी: विकास कांबळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत) यांची ६ एप्रिलपासून नियुक्ती
वाळपई: राजू देसाई (वन सेटलमेंट अधिकारी, उत्तर गोवा) यांची ९ एप्रिलपासून नियुक्ती