मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जावू; कदंब कर्मचाऱ्यांचा इशारा, पणजी आझाद मैदानावर केली निदर्शने
By पूजा प्रभूगावकर | Updated: July 14, 2023 20:03 IST2023-07-14T20:02:08+5:302023-07-14T20:03:03+5:30
कदंब कर्मचाऱ्यांनी पणजी येथील आझाद मैदानावर निदर्शने केली.

मागण्या मान्य करा, अन्यथा संपावर जावू; कदंब कर्मचाऱ्यांचा इशारा, पणजी आझाद मैदानावर केली निदर्शने
पूजा प्रभूगावकर, पणजी: सातव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी, माजी बस योजना रद्द करणे, इलेक्ट्रिक बसेसवर कंदब कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आदी मागण्या सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात, अन्यथा वेळ पडल्यास संपावर जावू, असा इशारा कदंब कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सदर मागण्यांसाठी कदंब कर्मचाऱ्यांनी पणजी येथील आझाद मैदानावर निदर्शने केली. यावेळी कदंब चालक व संलग्न कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली हे आंदोलन त्यांनी केले. यावेळी आयटकचे कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ॲड. राजू मंगेशकर, ॲड. प्रसन्ना उटगी व कदंब कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोन्सेका म्हणाले, २०१८ पासून प्रलंबित असलेल्या सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी कदंब महामंडळाचे कर्मचारी वारंवार मागणी करीत आहेत. सरकार ही थकबाकी देण्याचे आश्वासनही देत आहे. मात्र, अजूनही त्याची पूर्तता झालेली नाही. सदर मागणीसाठी संपावर जाण्याचा जानेवारी २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांनी निर्णय घेतला होता. मात्र, कामगार आयुक्तांनी त्यात हस्तक्षेप केल्यानंतर हा निर्णय स्थगित केला होतो. आता पुन्हा संपावर जाण्यापासून पर्याय राहिला नसल्याचे स्पष्ट केले.