आरटीओ किंवा पोलिसांनी पकडल्यास इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सादर करण्याची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 13:50 IST2018-11-26T13:40:35+5:302018-11-26T13:50:05+5:30
आरटीओ किंवा पोलीस अधिकाऱ्याने वाहनधारकाकडे कागदपत्रांची मागणी केल्यास यापुढे इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील दस्तऐवज सादर करता येतील.

आरटीओ किंवा पोलिसांनी पकडल्यास इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सादर करण्याची मुभा
पणजी : आरटीओ किंवा पोलीस अधिकाऱ्याने वाहनधारकाकडे कागदपत्रांची मागणी केल्यास यापुढे इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील दस्तऐवज सादर करता येतील. केंद्रीय मोटर वाहन नियम १३९ मध्ये तशी दुरुस्ती करण्यात आली असून या नव्या दुरुस्तीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्याचे पोलिस महासंचालक तसेच वाहतूक सचिवांना पत्र लिहून दिले आहेत.
आरसी बूक, वाहनाचा विमा, वाहन फिटनेस तसेज परमिट, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), प्रदूषण तपासणी दाखला आदी कोणत्याही दस्तऐवजांची आरटीओ किंवा पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास सदर दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सादर करता येतील.
वाहनधारकांच्या सोयीसाठी त्यांना आता हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे वाहनधारकांना वरील कागदपत्रे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही. १९८९ च्या केंद्रीय मोटर वाहन नियमातील या दुरुस्तीबाबत पोलीस तसेच सरकारी यंत्रणेच्या अन्य संबंधित अधिकाऱ्यांनाही माहिती देऊन जागृती घडवून आणावी, असे आवाहन या पत्रात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांनी केले आहे.