Abhilash Tomy : नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांची ही यशस्वी कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:52 IST2018-09-25T11:51:45+5:302018-09-25T11:52:28+5:30
Abhilash Tomy : आॅस्ट्रेलियाच्या खोल समुद्रात नौका (यॉट) स्पर्धेच्यावेळी 14 मीटर उंचीच्या लाटेच्या तडाख्यात गंभीर जखमी झालेला भारतीय नौदलाचे गोवास्थित अधिकारी लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी (वय 39 वर्ष) यांनी याआधी अनेक सागरी परिक्रमांमध्ये भाग घेऊन त्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत.

Abhilash Tomy : नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांची ही यशस्वी कामगिरी
पणजी : आॅस्ट्रेलियाच्या खोल समुद्रात नौका (यॉट) स्पर्धेच्यावेळी 14 मीटर उंचीच्या लाटेच्या तडाख्यात गंभीर जखमी झालेला भारतीय नौदलाचे गोवास्थित अधिकारी लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी (वय 39 वर्ष) यांनी याआधी अनेक सागरी परिक्रमांमध्ये भाग घेऊन त्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. अभिलाष यांना त्यांच्यावर उद्भवलेल्या या संकटानंतर फ्रेंच मच्छिमारी नौकेवरील कर्मचा-यांनी वाचविले. गोव्याच्या या नौदल अधिका-याने ‘आयएनएसव्ही म्हादई ’या शिडाच्या बोटीतून दक्षिण पूर्व आशिया सफर केली. या सागरी परिक्रमेत अभिलाष यांनी चार जणांच्या पथकाचे नेतृत्त्व केले. १७ मार्च २0१२ रोजी वेरें येथील आयएनएस मांडवी तळावरुन ही बोट निघाली आणि मलेशिया व थायलँडला भेट देऊन ५000 सागरी मैल अंतर पार करुन परतली. भर समुद्रात इंजिनाशिवाय शिडाच्या सहाय्याने बोट हाकण्याचे साहस नौदलाचे हे पथकाने केले.
अभिलाष त्यावेळी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले होते की, ‘अनेकदा जोरदार वारा असतो त्यामुळे बोट भरकटण्याचा संभव असतो ती नियंत्रणाखाली ठेवून आखून दिलेल्याप्रमाणेच मार्गक्रमण करणे मोठे जिकिरीचे काम असते. दिवसभर कडक उन्हातून प्रवास करावा लागतो. इंजिनचा वापर केवळ आणीबाणीच्यावेळीच केला जातो नपेक्षा या सफरीचे भवितव्य निसर्गावरच अवलंबून असते. त्यामुळे मोठी कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते.’
अभिलाष यांनी त्याआधीही गोवा ते दक्षिण आफ्रिकेतील केप आॅफ टाउन असा साडेपाच हजार सागरी मैलांचा प्रवास शिडाच्या बोटीतून एकट्याने केलेला आहे. सहा महिला नौदल अधिका-यांनी अलीकडेच ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून तब्बल २५४ दिवसांची सागर परिक्रमा पूर्ण केली. या सहा महिला नौदल अधिका-यांनाही कमांडर अभिलाष टॉमी यांचे मार्गदर्शन लाभले होते.