मतदारांवर आम आदमी पक्षाची जादू चालली नाही; राज्यात ४२ पैकी एकच उमेदवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 09:14 IST2025-12-23T09:14:16+5:302025-12-23T09:14:16+5:30
पक्षाच्या रणनीतीचे हवे चिंतन

मतदारांवर आम आदमी पक्षाची जादू चालली नाही; राज्यात ४२ पैकी एकच उमेदवार विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाचे (आप) ४२ पैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला. त्यामुळे मतदारांवर आपची जादू काही चालली नाही. त्यामुळे पक्षाची रणनीती कुठे कमी पडली, याचे परीक्षण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
खरेतर जिल्हा पंचायत निवडणुका आपने स्वतंत्रपणे लढवल्या. काँग्रेस तसेच अन्य राजकीय पक्षांबरोबर त्यांनी युती केली नव्हती. या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीप्रमाणे महत्त्व देत उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आतिशी मार्लेना हे मैदानात उतरले आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात त्यांनी प्रचार केला होता. मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही.
आपने जिल्हा पंचायत निवडणुकीत ४२ उमेदवार उभे केले होते. तर आठ जागांवर त्यांनी अन्य उमेदवारांना पाठिंबा दिला होता. केवळ कोलवा येथून आंतोनियो फर्नाडिस या उमेदवाराचा ७३ मतांनी विजय झाला. त्यांना ३ हजार २१४ मते मिळाली तर नेली रॉड्रिग्स यांना ३ हजार १४१ मते मिळाली. त्यांच्या विजयात बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांचा मोठा वाटा आहे. तर वेळ्ळीत पक्षाचे आमदार क्रुज सिल्वा असतानाही इसाका फर्नाडिस यांचा पराभव झालो. तेथे काँग्रेसचे ज्युलिओ फर्नाडिस हे ४ हजार ८३ निवडून आले. यावरून क्रुज यांचा प्रभाव कमी पडल्याचे दिसून आले.
कडवी टक्कर
आपच्या उमेदवारांनी काही मतदारसंघांमध्ये विरोधी उमेदवारांना कडवी टक्कर दिली असली तरी त्याचे रूपांतर विजयात होऊ शकले नाही. काही ठिकाणी पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांना दुखावल्याने त्यांनी उमेदवारांचा प्रचार करण्यास फारसा रस दाखवला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यातून पक्षाच्या निकालावर परिणाम दिसून आला. ताळगाव तसेच व अन्य काही मतदारसंघात आपच्या उमेदवारांना १ हजार मतांचाही आकडा गाठता आला नाही.
विधानसभेची सेमिफायनल
जिल्हा पंचायत निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर झाल्याने ती २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून पाहिली जात आहे. मात्र त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षाला आता ग्राऊंडवर उतरुन बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.