स्वार्थासाठीच आप-काँग्रेस युती; मनोज परब यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:30 IST2025-03-12T07:29:56+5:302025-03-12T07:30:48+5:30
आरजीचा 'उजो मोड ऑन', 'झेडपी' निवडणुकीबाबत लवकरच निर्णय

स्वार्थासाठीच आप-काँग्रेस युती; मनोज परब यांची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आम आदमी पक्ष व काँग्रेसने केवळ आपले राजकीय करियर वाचवण्यासाठी युती केली होती. त्यांची ही युती पूर्णपणे स्वार्थासाठी होती, असा आरोप रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे नेते मनोज परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
गोमंतकीयांसाठी केवळ आरजीच प्रादेशिक पक्ष बनून लढू शकतो. त्यामुळे आरजी आता पुन्हा एकदा जोमाने काम करणार असून आपला 'उजो मोड' आता ऑन केला असल्याचेही परब म्हणाले. यावेळी आमदार वीरेश बोरकर, पक्षाचे नेते विश्वेश नाईक व अजय खोलकर उपस्थित होते.
आप पक्षाच्या नेत्या तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस ही विश्वासास पात्र नाही, असे विधान करुन आगामी विधानसभा निवडणुकीत एकला चलो रेची भूमिका मांडली. काँग्रेसचे आमदार पक्षांतर करीत असल्याने युती करणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यांनी जे कारण दिले ते जुने आहे. यात नवीन काहीच नाही. लोकसभा निवडणुकीत आप व काँग्रेसने केवळ आपले राजकीय करियर वाचवण्यासाठीच युती केल्याचे स्पष्ट झाले आहे. युतीचा अंत हा असाच होणार हे ठाऊक होते म्हणूनच आरजीने त्यांच्या सोबत युती केली नाही. मात्र तेव्हा आमच्यावर टीका झाली होती, याची आठवणही परब यांनी करून दिली.
'झेडपी' निवडणुकीबाबत लवकरच निर्णय
आरजी पक्षाने आपल्या सदस्य मोहीमेला सुरुवात केली आहे. पक्ष संघटना बुथवर किती सशक्त आहे याचा अभ्यास केल्यानंतर आगामी जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्यावर आरजी निर्णय घेईल, असे मनोज परब यांनी सांगितले.