पर्तगाळ येथे रंगणार रामभक्तीचा महामेळा; ५५० कोटी वेळा नामजप अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:02 IST2025-11-27T13:01:26+5:302025-11-27T13:02:39+5:30
पर्तगाळ जिवोत्तम मठाचा सार्ध पंचशतमानोत्सव

पर्तगाळ येथे रंगणार रामभक्तीचा महामेळा; ५५० कोटी वेळा नामजप अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या ५५० वर्षपूर्तीनिमित्त साजरा होणारा सार्ध पंचशतमानोत्सव २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत होत आहे. पर्तगाळी मठ येथे आयोजित केलेल्या या भव्य-दिव्य, ऐतिहासिक उत्सवात देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार आहेत. शुक्रवारी, दि. २८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा श्रीरामाच्या भव्य पुतळ्याचे अनावरण हे मुख्य आकर्षण असणार आहे.
पर्तगाळ जिवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी या सोहळ्यात सरकारचे प्रतिनिधी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, उद्योजक शिवानंद साळगांवकर व इतर मान्यवर उपस्थित होते. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची समृद्ध मालिका आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी पालिमारू मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी, पत्ताशीष्य श्रीमद विद्यराजेश्वर तीर्थ स्वामी, संस्थान गौडपादाचार्य कवळे मठाधीश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वामी आणि चित्रापूर मठाधीश श्रीमद सयोक्त शंकराश्रम स्वामी उपस्थित राहणार आहेत.
उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे उभारलेली ७७ फूट उंच भगवान श्रीरामांची ब्रांझची मूर्ती. ही दक्षिण आशियात सर्वात उंच मानली जाते. यासोबतच १०,००० चौ. फूट क्षेत्रफळात रामायण थीम पार्क सज्ज केले असून भगवान श्रीरामांच्या आदर्शाचे दर्शन घडवणारे विविध विभाग, टपाल तिकीट प्रदर्शन, प्राचीन नाणी, विजयनगर साम्राज्यातील चित्रशैली यांचाही समावेश आहे.
५५० कोटी वेळा नामजप अभियान
उत्सवातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे 'सार्ध पंचशतकोटी श्री राम नाम जप' अभियान. पूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ५५० कोटी वेळा रामनाम जपाचा संकल्प पूर्ण केला जाईल.
या सोहळ्यादरम्यान देश-विदेशातील हजारो २ भक्त पर्तगाळ येथे येथील. उत्सवाचे थेट प्रक्षेपणही विविध माध्यमांद्वारे करण्यात येणार आहे. प्रथमच मठाच्या इतिहासात २४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सात दिवसांचा भजनी सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनाशी जोडला आहे.
शाळांना सुटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी, दि २८ नोव्हेंबरला पर्तगाळ येथे येणार आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेकरीता काणकोणमधील सर्व शाळांना सुटी - देण्यात आली आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.