राज्यात ८२ हजार रेशन कार्डे निलंबित; नागरी पुरवठा खात्याची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 13:29 IST2023-02-18T13:25:07+5:302023-02-18T13:29:33+5:30
गोव्यात सहा महिने धान्य न घेणारे रडारवर

राज्यात ८२ हजार रेशन कार्डे निलंबित; नागरी पुरवठा खात्याची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेशनवरील धान्य कोटा गेले सहा महिने न उचलणाऱ्यांची रेशन कार्ड निलंबित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत ८२ हजार रेशन कार्ड निलंबित करण्यात आली. नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी यास दुजोरा दिला.
याबाब पार्सेकर म्हणाले की, 'ज्यांची कार्ड निलंबित केली आहेत, त्यांनी महिनाभरात अर्ज करावे लागतील. कारण द्यावे लागेल आणि केवायसी प्रक्रियाही पूर्ण करावी लागेल. यात १० हजार कार्ड अशी आहेत, की ती कुटुंबे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांमधील आहेत. दरम्यान, जे सरकारी कामाला आहेत आणि एएचएच किंवा एएवाय अति गरिबांसाठीची रेशन कार्ड घेतलेली आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे, कार्ड बदलून एपीएल कार्ड घेण्यासाठी त्यांना काही अवधी दिला जाईल. रेशन कार्डवर महिन्याचा धान्य कोटा न उचलणाऱ्यांची कार्ड १ फेब्रुवारीपासून निलंबित केली जातील, असे जाहीर करण्यात आले
होते. कार्डाचे निलंबन उठवण्यासाठी अन्नधान्य कोट्याचा लाभ न घेतल्याच्या वैध कारणासह अर्जासह तालुका नागरी पुरवठा कार्यालयाकडे जावे लागेल. खुल्या बाजारात न उचललेल्या अन्नधान्याच्या कथित विक्रीला आळा घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.
काळाबाजार रोखणार
अलीकडेच धान्य तस्करीचे उघडकीस आलेले प्रकरण तसेच तूरडाळ गोदामात सडविल्याचे व त्यामुळे दोन ते तीन कोटी रुपयांची नुकसानी झाल्याचे प्रकरण व १० मेट्रिक टन साखर गोदामात वितळल्याचे प्रकरण या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. रेशन दुकानांवरून न उचललेल्या धान्याचा काळाबजार होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"