गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:31 IST2025-05-04T06:31:10+5:302025-05-04T06:31:21+5:30
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर ८० जण जखमी झाले असून यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.
शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली. या बैठकीत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची तर जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीत्ते, उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश दिले.
नेमके काय घडले?
लईराई देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर म्हणाले की, पहाटे अग्निदिव्यावेळी धोंडाच्या दोन गटांमध्ये काहीतरी वाद झाला व नंतर धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
त्यानंतर गर्दी उसळली, त्यातील काहीजण जत्रेनिमित्त लावण्यात आलेल्या स्टॉलवर पडले व त्याचवेळी स्टॉलला वीजपुरवठा करणाऱ्या केबलला स्पर्श झाल्याने शॉक बसला आणि गोंधळ उडाला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन सहा निष्पात भाविक व धोंडांचा मृत्यू झाला.