ट्रकखाली येऊन 54 वर्षीय इसमाचा मृत्यू
By पंकज शेट्ये | Updated: February 22, 2024 22:05 IST2024-02-22T22:04:45+5:302024-02-22T22:05:05+5:30
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत अधिक तपास करीत आहेत.

ट्रकखाली येऊन 54 वर्षीय इसमाचा मृत्यू
वास्को: गुरुवारी (दी. 22) रात्री दाबोळी महामार्गावर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दाबोळी येथे राहणारा 54 वर्षीय शौकत अली शेख याचा जागीच मृत्यू झाला. शौकत दुचाकीने जाताना त्याची समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक बसल्यानंतर तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानंतर गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची माहिती वास्को पोलिसांकडून मिळाली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री सातच्या सुमारास तो अपघात घडला. 54 वर्षीय शौकत अली शेख दुचाकीने वेर्णा दिशेने जाण्यासाठी निघाला होता. शौकत दबोळी महामार्गावर पोचला त्यावेळी त्याच्यापुढे असलेला ट्रकही वेर्णाच्या दिशेने जात होता. महामार्गावरील ट्राफिक सिग्नल पडून पुन्हा सुटल्यानंतर शौकत त्याच्या दुचाकीने ट्रकच्या मागून जाताना त्याची धडक ट्रकच्या मागे बसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. ट्रकला धडक बसल्यानंतर शौकत पडून तो ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला अशी माहिती प्राप्त झाली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या शौकतला तेथे असलेल्या काही लोकांनी त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेला, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वास्को पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मरण पावलेला शौकत पेंटरचे काम करायचा अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर सावंत अधिक तपास करीत आहेत.