इफ्फीच्या उद्घाटनास ५ हजार आसन व्यवस्था
By Admin | Updated: November 17, 2014 02:00 IST2014-11-17T01:58:32+5:302014-11-17T02:00:35+5:30
मिलिंद नाईक यांनी घेतला तयारीचा आढावा

इफ्फीच्या उद्घाटनास ५ हजार आसन व्यवस्था
पणजी : इफ्फीच्या तयारीला वेग आला असून माहिती व प्रसिद्धी खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी रविवारी अधिकाऱ्यांसह ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. स्टेडियमवर लाकडी प्लॅटफॉर्म तयार करून तेथेही खुर्च्या घातल्या जाणार असून किमान ५ हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी व्यवस्था असणार आहे.
मंत्री नाईक यांनी ही माहिती पाहणी केल्यानंतर ‘लोकमत’ला दिली. एरव्ही इफ्फीच्या उद्घाटनासाठी कांपाल येथे बांदोडकर फुटबॉल मैदानावर मोठा शामियाना घातला जात असे. गेल्या वर्षी त्यावर साडेचार कोटी रुपये खर्च आला होता व केवळ ३ हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था झाली होती. या वर्षी उद्घाटन व समारोप सोहळा श्यामाप्रसाद स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे शामियान्याचा खर्च वाचणार तर आहेच, शिवाय अन्य बाबतीतही काटकसर केली जात असल्याने यंदा खर्च थोडा कमी होईल, असा दावा नाईक यांनी केला.
आयनॉक्स, कला अकादमी तसेच मनोरंजन संस्थेच्या कार्यालयालाही नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी १८ रोजी पुन्हा भेट देऊन कामाचा अंतिम आढावा ते घेणार आहेत. सर्व कामे वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
इफ्फीत सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रजनीकांत उपस्थिती लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी माहिती खात्याचे सचिव पवनकुमार सेन, संचालक अरविंद बुगडे, मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष दामू नाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)