गोव्यात ५० दिवसांत ३० महिलांचा कोविडने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:09 IST2020-12-24T15:09:29+5:302020-12-24T15:09:47+5:30
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोविडमुळे जास्त बळी

गोव्यात ५० दिवसांत ३० महिलांचा कोविडने मृत्यू
पणजी : गेल्या साधारणत: पन्नास दिवसांमध्ये एकूण तिस महिलांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. या महिला साठ वर्षांहून जास्त वयाच्या आहेत. अवघ्याच महिला पन्नास ते साठ वर्षे अशा वयोगटातील आहेत.
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोविडमुळे जास्त बळी गेले. तुलनेने डिसेंबर महिन्यात जास्त मृत्यू झाले नाहीत. गेल्या ५० दिवसांत १०८ व्यक्तींचा कोविडने बळी घेतला. त्यात ३० महिला आहेत. बहुतांश पुरुष रुग्णांचा जीव गेला. या पुरुष रुग्णांमध्ये ९० टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.
डिसेंबर महिन्यात आतापर्यंत म्हणजे दि. २४ डिसेंबरपर्यंत एकूण ४० कोविड रुग्णांचे मृत्यू झाले. त्यात त्यात तेरा महिलांचा समावेश आहे. म्हणजेच डिसेंबरमध्ये जे एकूण कोविड रुग्ण मरण पावले, त्यात एक तृतीयांश महिला आहेत.
राज्यात आतापर्यंत कोविडने ७२७ बळी घेतले आहेत. ज्या महिला किंवा पुरुष रुग्णांचे कोविडने मृत्यू झाले, त्यापैकी अनेकांना काही गंभीर असे आजार होते. काहीजणांनी कोविड झाल्यानंतरही चाचणी करून घेण्यास व उपचार करून घेण्यास विलंब केला. काहीजण खूपच उशिरा इस्पितळात दाखल झाले.
राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांत वाढली ही चिंतेची गोष्ट मानली जाते. आता एक हजार सक्रिय रुग्ण आहेत पण २२ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्ण ९४७ होते. त्यापूर्वी ९४१ संख्या होती. २० डिसेंबर रोजी मात्र संख्या ९७२ होती आणि १८ रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ९६१ होती.
सात ठिकाणी कोविडग्रस्तांची संख्या खूप कमी झाली आहे. धारबांदोडा, बाळ्ळी, डिचोली, वाळपई, सारवर्णे, मये, कोलवाळे येथे आता कोविडग्रस्तांची संख्या कमी आहे. साखळीत अजून संख्या वीस आहे.