3 crore spent on central governments gst meet held in goa reveals rti | केंद्र सरकारच्या 'त्या' बैठकीवर राज्य सरकारकडून तब्बल ३ कोटी रुपये खर्च 

केंद्र सरकारच्या 'त्या' बैठकीवर राज्य सरकारकडून तब्बल ३ कोटी रुपये खर्च 

पणजी : गोव्यात अलीकडेच झालेल्या जीएसटी मंडळाच्या बैठकीवर राज्य सरकारच्या तिजोरीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये खर्च केल्याची माहिती आयरिश रॉड्रिग्स यांना आरटीआय अर्जातून प्राप्त झाली आहे. 

जीएसटी मंडळाची ३७ वी बैठक १९ व २० सप्टेंबर असे दोन दिवस कदंब पठारावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली होती. यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी म्हणून वास्को येथील मेसर्स विन्सन ग्राफिक्स या कंपनीची निवड केली गेली आणि या कंपनीला तब्बल १ कोटी ९५ लाख ६० हजार रुपये देण्यात आले. होर्डिंग्स तसेच अन्य प्रकारच्या जाहिराती, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे फोटो असलेले मोठे फलक यावरही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. 

ज्या हॉटेलमध्ये बैठक झाली त्या पंचतारांकित हॉटेलला ५० लाख ६९ हजार ६०० रुपये बिल फेडण्यात आले. या हॉटेलमधील आलिशान प्रेसिडेन्शियल खोलीच्या भाड्यावर रात्रीला ५९,५०० रुपये भाडे देण्यात आले. दोनापॉल येथील अन्य एका पंचतारांकित हॉटेलात पाहुण्यांच्या निवास व्यवस्थेवर ३० लाख रुपये खर्च केले. प्रतिनिधींसाठी २०० टॅक्सी भाड्याने घेतल्या व त्यावर ५० लाख रुपये खर्च केले.  

वाणिज्य कर आयुक्तांनी या खर्चाच्या मंजुरीसाठी बैठकीच्या दोन दिवस आधी १७ सप्टेंबर रोजी नोट पाठवला आणि दोन दिवसातच घाईघाईत खर्चाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीवरील खर्चाची आणखी बिलेही यायची आहेत. आयरिश यांच्या म्हणण्यानुसार या उधळपट्टीच्या प्रकरणाची लोकायुक्तांनी चौकशी करायला हवी. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही आणि अशा बैठकांवर उधळपट्टी चालली आहे, अशी टीका आयरिश यांनी केली आहे. ही बैठक पंचतारांकित हॉटेलांऐवजी दोनापॉल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये किंवा पर्वरी येथे सचिवालय सभागृहात घेता आली असती, असे आयरिश म्हणाले. 

Web Title: 3 crore spent on central governments gst meet held in goa reveals rti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.